मुंबई : कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण डी विभागातील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रूपाने समोर आले आहे. महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करताना आढळलेले १५ तोळे सोने पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सत्कार करीत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘अस्तित्व’ नाटकाची तिकिटे भेट देत अनोखे पारितोषिकही दिले.
कुंभार रविवारी महर्षी कर्वे रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी त्यांना अंदाजे १५ तोळे सोने (१० तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट, पाच तोळ्यांची सोन्याची वळी) आढळून आले. त्यासोबत मूळ मालकाचा पुरावा नसल्याचे पाहून सुनील कुंभार यांनी मुकादम बाळाराम जाधव यांच्याकडे ते सोने सुपुर्द केले. त्यानंतर, त्यांनी नजीकच्या दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाणे येथे जाऊन १५ तोळे सोने सापडल्याची माहिती दिली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सदर सोने पोलिस शिपाई दीपक डावरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.