देशाप्रती खरी कळकळ दिसली, ज्येष्ठ कवी महानोर यांनी केलं राज ठाकरेंचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:59 PM2019-04-09T18:59:29+5:302019-04-09T19:00:44+5:30
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
मुंबई - मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केलेलं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्ण हेलावणारं असल्याचं होतं असं ना.धो महानोर यांनी सांगितले.
राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्येष्ठ कवी ना.धो महानोर म्हणतात की, आपल्या भाषण शैलीत उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा त्यात होता. देशाप्रतीची खरी कळकळ आपल्या भाषणातून दिसून आली. व्यंग दाखविण्याची व सडेतोड त्याची चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका असताना आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेत त्याची चिरफाड केली होती. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आज आपण करत आहात असं सांगत ना.धो महानोर यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या.
मागच्या शनिवारी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टार्गेट केलं होतं. देश इतका खड्ड्यात घालून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे पुन्हा पैसे वाटायला येत आहेत,मी सांगतो आले पैसे द्यायला तर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. ह्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायची म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना करण्यात आलं होतं.
नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवलं, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेंव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार ? असा सवालही राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात उपस्थित केला होता तसेच मोदी सरकारच्या योजनेची पोलखोल करत हे तुमचं सरकार लाभार्थीच्या घोषणा करणारं सरकार? किती खोटं बोलणार? पंतप्रधान खोटं बोलतात. आणि ह्यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मोदी देत नाहीत, भाजपचे नेते देत नाहीत आणि अंधभक्त देत नाहीत. पण एकच प्रश्न विचारतात 'मोदींना पर्याय काय असा टोलाही राज यांनी लगावला होता.