Join us

ऑडिशनला पोहोचले खरे पोलिस अन्...; अक्षयच्या प्रोडक्शनच्या नावाने गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 1:01 PM

पूजा आनंदानी (वय २८, रा. खार) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’मधून बोलत असल्याचा बनाव करत तरुणीला निर्भया खटल्याशी निगडित चित्रपटासाठी निवड झाल्याचे सांगून जाळ्यात ओढले. मात्र, पोर्टफोलिओसाठी पैशांची मागणी होताच तरुणीला संशय आला. तरुणीने अक्षयच्या पीएकडे चौकशी करताच आरोपीचा भंडाफोड झाला. ऑडिशनच्या चर्चेदरम्यान तरुणी थेट खऱ्या पोलिसांसोबत पोहोचताच आरोपी जाळ्यात आल्याचा प्रकार जुहूमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी  प्रिन्सकुमार राजन अंजनीकुमार सिन्हा (२९, रा. विलेपार्ले) याला अटक केली आहे. 

पूजा आनंदानी (वय २८, रा. खार) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ३ एप्रिलला त्यांना एकाने फोन करून अक्षय कुमारच्या कंपनीतून रोहन मेहरा बोलत असल्याचे सांगितले. निर्भया प्रकरणाशी संबंधित प्रकल्पासाठी निवड झाल्याचे त्यांना सांगत काही फोटो, माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी माहिती दिली. त्यानंतर विलेपार्ले परिसरातील भेटीत त्यांना एक स्क्रिप्ट वाचण्यास दिली. पुढे स्क्रिप्टवर अक्षय कुमारची सही असल्याचे दाखवले. पूजा यांनी सहकलाकारांबाबत विचारणा करताच, सिनेमात अक्षय कुमार, बॉबी देओल, राधिका आपटे, रिचा चड्डा असल्याचे सांगितले.  या पात्रासाठी १२ ते १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याच्या सांगण्यानुसार एक ऑडिशनचा व्हिडीओ बनवून पाठविला.

वडिलांना संशय अन्... ४ एप्रिलला सकाळी आरोपीने पूजा यांना फोनद्वारे निवड झाल्याचे सांगितले. तर रात्री भेटीत वजन कमी करण्याचा सल्ला देत पोर्टफोलिओसाठी ६ लाख मागितले. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटोशूट असल्याने ६ लाखांचा खर्च सांगितला. पूजा यांच्या वडिलांना संशय आला. त्यामुळे पूजा यांनी अक्षय कुमारच्या पीएकडे संपर्क साधून रोहनबाबत चौकशी केली. तेव्हा या नावाची व्यक्ती तेथे काम करत नसल्याचे समजले. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी ९ तारखेला रोहनसोबत जुहू येथे भेट ठरवली. 

पोलिसांसोबत चर्चा फसवणुकीच्या संशयाबाबत पूजा यांनी जुहू पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकासह जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये गेले. पूजा यांच्या वडिलांनी रोहनकडे चौकशी केली. पोर्टफोलिओबाबत चर्चेनंतर बँक खात्याचा धनादेश देतो असे सांगितले. तेव्हा, खाते क्रमांक पाठवतो म्हटल्यावर फसवणूक होत असल्याची खात्री पटली. अखेर, त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत त्याचे नाव प्रिन्सकुमार असल्याचे उघड झाले असून, तो कास्टिंग करण्याचे काम करतो.

टॅग्स :गुन्हेगारीअक्षय कुमारपोलिसमुंबई