लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांसाठी रविवारी सुरू झाली आहे. लोकल सुरू झाल्यामुळे अनेकजण लस घेण्यासाठी घाई करू लागले आहेत. परंतु, रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्याने लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळाली नाही. मंगळवारी गर्दीत वाढ होण्याची शक्यता असून, उद्या प्रशासनाची खरी परीक्षा असणार आहे.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे. ४५ ते ६० वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे तर ६०हून अधिक वयाचे प्रवासी आता प्रवास करणे टाळत आहेत. सोमवारी सुट्टी असल्याने रेल्वे स्थानकांवर जास्त गर्दी नव्हती. पण अनेक प्रवाशांची तक्रार आहे की तिकीट मिळत नाही केवळ पास दिला जात आहे. जर महिन्यातून दोनवेळा जायचे आहे तर महिन्याचा पास का काढायचा, हा प्रश्न आहे. तसेच बहुतांश कामगारवर्ग हा १८ ते ४४ वयोगटातील असल्याने त्यांना जूनमध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
प्रवासी अजय माने यांनी सांगितले की, खूप दिवसांनी लोकल प्रवास करण्यासाठी मिळत आहे. त्यामुळे मी आज आनंदी आहे. लोकल बंद असल्याने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती, मात्र आता दिलासा मिळाला आहे.