मुंबई : टपाल खात्याद्वारे एखादी वस्तू, पार्सल पाठवल्यास ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचले की नाही याबाबत त्याची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी टपाल खात्याच्या पोस्टमन मोबाइल अॅपचा (पीएमए) लाभ होत आहे. हे अॅप पोस्टमनसाठी तयार केले असून याद्वारे डिलिव्हरी झाल्यानंतर तत्काळ त्याची माहिती या अॅपवर अपलोड करत ज्यांना पार्सल दिले त्यांची डिजिटल स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे टपालाद्वारे पाठवलेल्या पार्सल व इतर वस्तूंची माहिती आता क्षणाक्षणाला मिळणे शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या वर्धापन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई जीपीओचे संचालक के. मुनीरमय्याह यांनी ही माहिती दिली.
मोबाइल अॅपसाठी राज्यातील सुमारे सव्वासात हजार पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. पार्सल व इतर वस्तू पोचवल्यानंतर त्वरित त्याची नोंद या अॅपवर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पूर्वी पोस्टमन सायंकाळी काम संपवून कार्यालयात आल्यावर माहिती अपडेट केली जात होती. आता ही माहिती वेळोवेळी अपडेट होणार असल्याने ती ग्राहकांना मिळू शकेल. तसेच पोस्ट आॅफिस सेव्हिंग्ज बँकेच्या (पीओएसबी) खातेदारांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवण्यात आली असून टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या सुमारे ३ हजार ग्राहकांद्वारे त्याचा लाभ घेतला जात आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) ४२ शाखांद्वारे व १२ हजार २ अॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून ५ लाख ३६ हजार ४६५ जणांनी खाते उघडले असून पीओएसबीच्या ७१ हजार ५३१ खातेदारांनी त्यांचे खाते आयपीपीबीला संलग्न केले आहे. याचाच पुढचा भाग म्हणून डिजिटल ग्राम संकल्पना राज्यात राबवण्यात येत आहे.
नवी मुंबईतील खुंटेवाडी या गावात ही योजना राबवण्यात येत असून या गावातील सर्व नागरिकांचे पोस्टाच्या बँकेत खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे ही खाती पेपरलेस असून बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्यात येतात. देशात सध्या ६५० खेड्यांमध्ये डिजिटल ग्राम संकल्पना राबवण्यात येत आहे.
पासपोर्ट व आधार केंद्रांचा लाभटपाल खात्यातर्फे ३५ पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत असून आणखी काही केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. २०१८-१९ या कालावधीत या केंद्रांच्या माध्यमातून २ लाख ६ हजार ७१० जणांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केले होते. २० जून २०१७ पासून टपाल खात्याच्या ६ विभागांमध्ये १२९३ केंद्रे तयार करण्यात आली. आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची कामे या केंद्रांद्वारे केली जातात. यासाठी ४३४० सरकारी मान्यताप्राप्त आॅपरेटरच्या माध्यमातून काम केले जाते. गेल्या वर्षभरात २ लाख ७७ हजार ८१२ जणांनी आधार नोंदणी केली तर ४ लाख ४६ हजार २४० जणांनी आधार अद्ययावतीकरण केले.