मुंबई - मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. मात्र, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तरीही 12 ते 13 टक्के आरक्षण मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया मराठा समाज आणि सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून येत आहे. छत्रपती संभाजीराजेंनीही या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. तर उदयनराजे भोसले यांनीही निर्णयाचे स्वागत केले आहे.
मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा, असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले. आरक्षणाच्या लढ्यात 50 पेक्षा जास्त तरुणांचं बलिदान झालं, त्यामुळे हे आरक्षण त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. तर, मराठा समाजाला प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या आरक्षणाचा आनंद झाला आहे. मराठा आरक्षण टिकणं हे महत्वाचं होतं, किती टक्के हा दुसरा मुद्दा आहे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे, पदवीधरपर्यंत मोफत शिक्षण शक्य नाही. मग, बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी केली. राज्यसभेतही बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा मुद्दा आज मी मांडला आहे, असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. मी मराठा समाजातील सर्व संबंधित घटक, संघटना आणि मराठा समाजाचे अभिनंदन करतो, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शैक्षणिकदृष्ट्या पिछाडीवर पडलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या हेतूने राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनेला धरून असल्याचा, वैध असल्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. फक्त मराठा समाजाचं आरक्षण 16 टक्के नसेल, तर नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्क्यांपर्यंत आरक्षण देता येईल, असं हायकोर्टाने नमूद केलं. या निकालाने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.