रिअॅलिटी चेक : ४७ बिबटे आणि मुंबईकर; कोण कोणाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:05 AM2021-06-21T04:05:42+5:302021-06-21T04:05:42+5:30
सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात वसलेल्या वस्त्यांमध्ये सातत्याने बिबट्या निदर्शनास ...
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात वसलेल्या वस्त्यांमध्ये सातत्याने बिबट्या निदर्शनास येण्याचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. गेल्याच आठवड्यात गोरेगाव येथील एका सोसायटीच्या परिसरात बिबट्याचे मुंबईकरांना दर्शन घडले किंवा तेथे तो निदर्शनास आला. मात्र, उद्यानाच्या लगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्या निदर्शनास येण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्या मनुष्यवस्तीच्या आवारात आढळत असून, येथील वाढता कचरा, वाढती भटक्या श्वानांची संख्या अशा समस्या याला कारणीभूत असल्याचे म्हणणे वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी मांडले असून, यावर उपाय म्हणजे मुंबईकरांनी सातत्याने सावध राहत येथील कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करणे हे होय.
प्रशासनाकडून अशा परिसरात सातत्याने जनजागृती केली जात असली तरी हॅलोजन लावणे, सावधानता बाळगणे या गोष्टींवरदेखील प्रामुख्याने भर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजच्या क्षणाला ४७ बिबटे असून, उद्यान परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये सातत्याने त्यांचा वावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी जंगलांवर अतिक्रमण केल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत असल्याची टीका सातत्याने केली जात असून, बिबट्या आपल्या घरात नाही तर आपण बिबट्याच्या घरात घुसलो आहोत, असे म्हणणेदेखील सातत्याने मांडले जात आहे. मात्र, आता कोण कोणाच्या घरात यावर वाद घालण्याऐवजी किंवा आरोप-प्रत्यारोपांच्या झाडी करण्याऐवजी बिबट्याला आपला त्रास होणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही, यावर नागरिकांनीच सावधानता बाळगली पाहिजे, यावर प्रामुख्याने जोर दिला जात आहे.