लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहराला आता सिमेंट काँक्रिटच्या जंगलाचा वेढा पडला असला तरी सुदैवाने आपल्याकडे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखा परिसर असून, येथे विविध प्रकारची जैवविविधतादेखील आहे. याच उद्यानाचा एक भाग असलेला बिबट्या मनुष्य वस्तीकडे ओढला जातो. त्याला अनेक कारणे असून, शिकारीमधल्या अनेक अडचणीनंतर एक ते दोन दिवस उपासमार झाली की बिबट्या सहज शिकारीसाठी मनुष्यवस्तीमध्ये येतो, असे निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले.
जंगलाजवळ मनुष्यवस्तीमध्ये मांजर, कोंबड्या, डुक्कर असे प्राणी पाळले जातात. शिवाय जनावरांचे तबेले आहेत. त्यात कचऱ्याचा भरणा अधिक आहे. यावर मोकाट श्वान फिरत असतात. अशा सगळ्या प्रमुख कारणांमुळे बिबट्या मनुष्य वस्तीकडे ओढला जातो. मुळात उद्यानात बिबट्यासाठी हरीण, माकड, ससे, रानकोंबड्या असे खाद्य आहे. मात्र, ते पकडण्यासाठी त्याला तासनतास वाट बघावी लागते. पाठलाग करावा लागतो. एवढे करूनही कधी शिकार मिळते कधी नाही. तेव्हा एक, दोन दिवस त्याची उपासमार होते. त्यामुळे तो सहज शिकारीसाठी मनुष्यवस्तीमध्ये येतो. केवळ मुंबई नाही तर ठाण्याच्या परिसरातदेखील बिबट्याचे दर्शन होते. आतापर्यंत बिबट्या बोरिवली, गोरेगाव, आरे, पवई, घाटकोपर, विक्रोळी येथे निदर्शनास आला आहे. अनेकवेळा झोपड्यांच्या सीमाभागात आढळणारे बिबटे जंगलात राहत नाहीत. गटारांची मोठी पाईपलाईन, गर्द झाडे; जेथे त्याला दिवसा लपण्यासाठी जागा मिळेल तेथे तो राहतो. बिबट्याच्या संचारामुळे भीती निर्माण होत असली तरी त्याची कारणे शोधून कार्यवाहीदेखील केली पाहिजे. केवळ वन विभागाला दोष देण्यात अर्थ नाही, असेदेखील निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले.