रिऍलिटी चेक : बोरिवली परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:05 AM2021-03-15T04:05:37+5:302021-03-15T04:05:37+5:30
पाण्याच्या वेळांतील बदल, पाण्याचा कमी प्रवाहमुळे नागरिक हैराण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवली बोरीवलीकरांसाठी पाण्याची समस्या म्हणजे आता ...
पाण्याच्या वेळांतील बदल, पाण्याचा कमी प्रवाहमुळे नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली बोरीवलीकरांसाठी पाण्याची समस्या म्हणजे आता नेहमीची झाली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी व्यक्त करतात. पाण्याच्या आधीच्या वेळांमध्ये आता फरक झाल्याने गृहिणींची तर चांगलीच तारांबळ उडत असल्याचे ते सांगतात. पाण्याची वेळ ही दुपारची असल्याने कामावर जाणाऱ्या महिलांना तर घरात कोणाला तरी ठेवूनच कामावर जावे लागते नाहीतर पिण्याच्या पाण्याचे हाल होतात. काही ठिकाणी ११ ते १ तर काही ठिकाणी १२ ते २ दरम्यान येणारे पाणी दोन तास असले तरी मोटार लावल्याशिवाय पाणी टाक्यांमध्ये भरत नसल्याच्या तक्रारी येथील नागरिक करतात. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या घरात पाणी भरण्यासाठी मोटरचा वापर होत असून त्याने वीजबिलात होणारी वाढ त्यांना भुर्दंड स्वरूपात भरावी लागते. त्यात ही पाण्याच्या दरम्यान वीज गेल्यास घरात ठणठणाट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सुरुवातीला येणारे पाणी ही काहीसे गढूळ स्वरूपातील असल्याच्या तक्रारी या परिसरातील रहिवासी करतात. त्यामुळे पाणी आल्यानंतरच्या दुसऱ्या तासात त्यांना पिण्याचे पाणी भरावे लागते. लॉकडाऊन काळात वीज वाहिनीच्या सुरू असलेल्या कामामुळे ही पाण्याच्या वेळांत बदल करण्यात आले होते, एक दिवस तर पाणी ही आले नव्हते असे नागरिकांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात सगळे घरीच असल्याने पाण्याच्या वेळांतील बदल, पाण्याचा कमी प्रवाह यामुळे खूप अडचण होते. प्रशासनाने किमान पाण्याच्या व्यवस्थेत बदल न करता त्याचे नियोजन आणखी व्यवस्थित व सुलभ कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे.
- मनीषा शिंदे, गृहिणी, चारकोप सेक्टर-३