रिअलिटी चेक : आओ जाओ घर तुम्हारा : टोलनाक्यांवर कोरोना चाचणी हवी सक्तीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:05 AM2021-03-22T04:05:22+5:302021-03-22T04:05:22+5:30
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता, मुंबई महापालिकेने मुंबई आणि वॉर्ड ...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता, मुंबई महापालिकेने मुंबई आणि वॉर्ड स्तरावर मोठ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र टोलनाक्यांवर याबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत आहे. कारण मुंबईत दाखल होत असतानाच दहिसर, वाशी, मुलुंड येथील दोन आणि ऐरोली टोलनाक्यांवर कोरोनाची चाचणीच होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच असून, यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हणणे जागृत नागरिकांनी मांडले आहे.
मुंबईत दाखल होताना जे पाच टोलनाके लागतात, त्या टोलनाक्यांवर मुंबई महापालिकेकडून कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मात्र ते बाहेरील जिल्ह्यांतून अथवा बाहेरील राज्यांतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करीत नाहीत; कारण त्यांना तशी कारवाई करण्याचे आदेशच नाहीत किंवा तसा काही प्रोटोकॉल नाही. प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, एवढेच त्यांना तपासायचे आहे. परिणामी कोरोनाची चाचणी होत नाही. म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भातील एखाद्या जिल्ह्यातून एखादा प्रवासी मुंबईत दाखल झाला तर त्याची कोरोना चाचणी टोलनाक्यावर होत नाही. मात्र अशा प्रवाशांत एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर मात्र तो अनेकांना लागण करू शकतो, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यांतून जे प्रवासी महाराष्ट्रात दाखल होत आहेत, त्यांच्या कोरोना चाचण्या सीमेवरच केल्या जातात; त्यामुळे टोलनाक्यांवर अशा चाचण्या होत नाहीत.