मुंबई : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली घट व लसीकरणाने पकडलेला वेग यामुळे सरकार हळूहळू निर्बंधांमध्ये शिथिलता देत आहे. रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे गर्दीदेखील होऊ लागली आहे. बस, रेल्वे, बाजारामध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारखी माणसांची गर्दी जमू लागली आहे. असे असले तरीदेखील नागरिकांच्या मनातली कोरोनाबद्दल असणारी भीती अजूनही संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिक कोरोनाचे नियम पाळत आहेत.
शुभम गवळी - सामान्य माणसाला आता लॉकडाऊन नकोसे झाले आहे. याचाच विचार करता सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. कोरोनाची भीती कायम असली तरीदेखील आर्थिक घडी विस्कटू न देणे हे देखील महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसांनी मास्क वापरणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे.
रसिका खैरनार - सणोत्सव व सार्वजनिक समारंभांमध्ये गर्दी केल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. सणासुदीचे दिवस आहेत. येत्या काळात अनेक मोठे समारंभदेखील होतील, त्यामुळे तिसरी लाट थोपविण्यासाठी स्वतःची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
निर्मला पाटील - दोन डोस घेऊनदेखील कोरोना झाल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. लस घेऊनदेखील आपण सुरक्षित आहोत की नाही, हा प्रश्न आहे. मास्क वापरणे व सुरक्षित अंतर राखणे, तसेच आरोग्य चांगले ठेवणे हाच पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे.
रामदास शेंडकर - पुढील काळात मंदिरे सुरू होणार आहेत. सिनेमागृह सुरू होणार आहेत, तसेच निवडणुकांचीदेखील रणधुमाळी सुरू होणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढणार आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण होईल का, ही भीती वाटत आहे. आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही.
भरत गायकवाड - कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. लसीकरण पूर्ण झाले असले तरीदेखील मास्क वापरणे गरजेचे आहे. काही नागरिक कोरोना संपल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. कोरोनाचे नियम येत्या काळातदेखील पाळावेच लागतील, अन्यथा तिसरी लाट अटळ आहे.