Join us

रिअ‍ॅलिटी चेक : एक बिबट्या साडेचार किलोमीटर अधिवासात फिरतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. एक बिबट्या साडेचार किलोमीटर अधिवासात फिरत असतो. संजय गांधी अभयारण्य त्यांच्यासाठी राखीव असूनही त्यांच्या प्रमाणाच्या टक्क्यानुसार कमीच आहे. मानवाला दिवसेंदिवस छोट्या जागेतून मोठ्या जागेची हाव आहे. या वनांचा आकार कमी होत गेला तर प्राण्यांनी काय करायचे? या पृथ्वीतलावर फक्त जगण्याचा अधिकार मानवाला आहे का? असा प्रश्न निसर्ग अभ्यासक संदीप सावंत यांनी केला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती झोपड्या व बहुमजली इमारती वाढत आहेत. जंगलाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. जंगलाचे काय फायदे आहेत, ते सर्वांनाच माहिती आहे. परंतु, मानव स्वार्थापायी जंगल नैसर्गिक स्रोत नष्ट करू पाहत आहे. मानवाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे आहे परंतु निसर्गातील जैवविविधता त्यांना नको आहे. हल्लीच गोरेगाव पूर्व संजय गांधी उद्यानालगतच्या परिसरात बिबट्या दिसला. प्रथमच दिवसा बिबट्या भक्षकासाठी दिसून आला. मुळात बिबट्या रात्रीचा भक्षणासाठी फिरत असतो. वन विभागातर्फे एखाद्या परिसरात बिबट्याचा वावर दिसल्यानंतर नागरिकांनी काय सावधानता बाळगावी, याची माहिती नेहमीच देण्यात येते. संजय गांधी वन विभागाच्या जवळील मानवी वस्ती, त्या परिसरात तारेचे कुंपण घालू शकत नाही. तरीही अनेक ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे बिबट्यासारख्या प्राण्यांचा जीव जाऊ शकतो, असेही संदीप सावंत यांनी सांगितले.