मुंबई : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उंदराने एका रुग्णाचा डोळा कुरतडल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे असले तरी अद्यापही या प्रकरणात प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. यावर लोकप्रतिनिधींनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे आणि आता रुग्णालयांच्या झाडाझाडतीसह याबाबत कारवाई करण्यासाठी आणि भविष्यातील उपाययोजना आखण्यासाठी लोकप्रतिनिधी स्तरावर बैठक होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी याप्रकरणी महापौरांची भेट घेणार आहेत. या बैठकीत लोकप्रतिनिधी राजावाडी प्रकरणासह रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्याबाबत यंत्रणेला सोमवारी जाब विचारणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते. याठिकाणी नेमलेले सफाई कर्मचारी यासाठी रात्रं-दिवस काम करतात. विशेषत: कोरोना काळात यात आणखी भर पडली आहे. अधिकाधिक स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. डॉक्टर असो, आया असोत, परिचारिका असोत वा सफाई कर्मचारी असोत प्रत्येकजण सफाईसाठी प्रयत्नशील असतो. मात्र, अनेकवेळा रुग्णालयातील भंगार साहित्य वेडवाकडे पडलेले असते. रुग्णालयाच्या इमारतीमधील ज्या मोकळ्या जागा असतात, तेथे साहित्य वेडेवाकडे पडलेले असते. कचऱ्याच्या डब्यांची व्यवस्था असली तरी संख्येने ते कमी असतात. अनेकवेळा त्यातील अन्नपदार्थांसह उर्वरित कचरा बाहेर पडलेला असतो. यात अनेकवेळा उष्टी खरकटी असतात. शिवाय इमारतीमधील अनेक मोकळ्या जागांमध्ये रुग्णांचे नातेवाईक अथवा इतरांकडून जेवणासाठीचे बस्तान मांडले जाते. यातून उरलेले पदार्थ आसपास टाकले जातात. अशावेळी ही स्वच्छता अग्रक्रमाने करणे अपेक्षित असते. मात्र, कामाचा ताण, अपुरे कर्मचारी, सातत्याने होणारी गर्दी अशा कारणांमुळे येथे स्वच्छता राहत नाही.
त्यामुळे अशा ठिकाणी घुशी, उंदीर यांचा वावर सुरु होतो आणि त्याचा फटका रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना बसतो. तसाच तो रुग्णालयादेखील बसतो. यावर उपाय म्हणून पुरेसे मनुष्यबळ वापरून उंदीर, घुशींची पैदास होणार नाही. त्यांचा वावर होणार नाही, यासाठी औषध फवारणी होणे गरजेचे असते. मात्र, असंख्य कारणांमुळे यात खंड पडतो. त्यामुळे राजावाडी रुग्णालयात घडलेली घटना इतर रुग्णलयांतदेखील घडण्याची शक्यता बळावते.
--------------
राजावाडी येथील घटनेनंतर मी लगेच महापौरांना पत्र दिले आहे. आता पुन्हा मुंबईतल्या कोणत्याही रुग्णालयात अशी घटना घडू नये, या दृष्टीकोनातून तातडीने एक बैठक लावा आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घ्या, असे मी त्या पत्रात म्हटले आहे. सोमवारी मी महापौरांना भेटणार आहे. आता सोमवारी बैठकीत चर्चा करून प्रशासन कसे काय करत नाही, हे पाहणार आहोत.
- दिलीप लांडे, आमदार, शिवसेना
--------------
चौकशीचे आदेश
राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका रुग्णाचा डोळ्याखालील भाग उंदराने कुरतडल्याची घटना समजताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने राजावाडी रुग्णालयाला २२ रोजी भेट देऊन संबंधित रुग्णाची पाहणी केली. तसेच याबाबत चौकशीचे आदेश दिले.
--------------
अतिदक्षता विभाग हा सोयीच्या दृष्टिकोनातून तळमजल्याला असला पाहिजे. परंतु, याठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्यानंतरही संबंधित घटना घडली, ही गंभीर बाब आहे.
- किशोरी पेडणेकर, महापौर