मुंबई : चांदिवली आणि पवई परिसरात पाण्याचा तितकासा तुटवडा जाणवत नसला तरी, काही भागांत दिवसातून ठरावीक वेळेत पाणी येत असल्याने त्याचा साठा करून ठेवावा लागतो. त्यामुळे आधीच आकाराने लहान असलेल्या घरांमध्ये पाण्याने भरलेली भांडी पाहुण्यांसारखी जपावी लागतात, अशी प्रतिक्रिया येथील गृहिणींनी दिली.
संघर्ष नगरमधील काही निवासी संकुलांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही घरांमध्ये कमी दाबाने पाणीपुवठा होतो. येथील बहुतांश संकुलांत दिवसातून एक तास पाणी सोडले जाते तेही रात्री नऊनंतर. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पाण्याची तजवीज आदल्या रात्री करावी लागते. नोकरदार महिलांना त्यामुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. एखाद्या दिवशी कामावरून घरी यायला उशीर झाल्यास पाणी मिळत नाही. त्याचा परिणाम घरातील नैमित्यिक कामांवर होतो, असे येथील रहिवासी वर्षा पाटील यांनी सांगितले.
मे महिन्यात चांदिवली परिसरात पाण्याची समस्या तीव्र होते. अशा वेळी टँकरसुद्धा मागवावे लागतात. त्यांच्याकडून ५० रुपये प्रतिबँरल अशा दराने पाणी विकत घ्यावे लागते. पिण्यासाठी बाटलीबंद पाणी आणावे लागते. काही वेळेस स्थानिक लोकप्रतिनिधी टँकरची व्यवस्था करतात. नवी जलजोडणी टाकल्यापासून गेल्या दोन वर्षांत येथील पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली असली, तरी तिचे मुळासकट उच्चाटन होणे गरजेचे असल्याचे येथील रहिवासी प्रमिला धायवसकर यांनी सांगितले.