लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४७हून अधिक बिबटे आहेत आणि येथील बिबट्यांना पोट भरून खाद्य उद्यानात उपलब्ध आहे. मात्र, शिकार करण्यातील अडचणी, अडथळे, आव्हाने आणि उद्यानाबाहेर सहज उपलब्ध होणारे खाद्य; अशा प्रमुख कारणांमुळे येथील बिबट्यांचा मनुष्य वस्तीमध्ये शिरकाव होत असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्य प्राणी बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, मानव आणि बिबट्या संघर्ष वाढतो आहे. याचे कारण असे की, लोकांना असे वाटते की बिबट्यांना उद्यानात अन्न उपलब्ध नसेल म्हणून ते बाहेर येतात. प्रत्यक्षात तसे नाही. उद्यानात बिबट्यांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध आहे. जंगलात शिकार करणे हे अवघड काम आहे. अवघड यासाठी की जेव्हा बिबट्या जंगलात शिकारीसाठी उतरतो तेव्हा माकडे ओरडतात आणि बाकीच्या प्राण्यांना सावध करतात. पक्षी ओरडतात. त्या मानाने शिकार करणे सोपे नसते. मात्र, ज्या सोसायटीमध्ये, ज्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळतो तेथे मोकाट श्वानांना मोठ्या प्रमाणावर खाद्य दिले जाते किंवा मोकाट श्वानांना तिथे खाण्यासाठी कचरा, खाद्य उपलब्ध असते.
बिबट्यांसाठी श्वान हे सॉफ्ट टार्गेट असते. बिबट्यांच्या हालचाली या सायंकाळनंतर सुरु होतात. मानवी हालचाली कमी झाल्यानंतर तो बिबट्या मनुष्य वस्तीलगत येतो. श्वानांच्या शोधात तो येथे येतो. परिणामी जेव्हा-जेव्हा जनजागृती केली जाते तेव्हा-तेव्हा मोकाट श्वानांना खाऊ घालू नका, असे आवाहन सातत्याने उद्यान प्रशासनाकडून केले जाते. आतापर्यंत आपण जर पाहिले तर बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना कमी आहेत. २०१७पासून अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त केला तर बिबट्या बाहेर येणारच नाही.
आता मुंबई महापालिकेने मोकाट श्वानांचा बंदोबस्त केला पाहिजे. दुसरे असे की मानवी वस्तीमध्ये मोकाट श्वानांना खाऊ घालणे बंद केले पाहिजे. कोणत्याही प्राण्यांना खाऊ घालून त्यांची गैरसोय करू नका. एव्हाना माकडांनासुद्धा खाऊ घालू नका. कारण माकडांना आपण सवय लावली तर त्याचे नैसर्गिक खाद्य सोडून ते आपल्या भोवती फिरत राहतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सवयी खराब करू नयेत. निसर्गचक्र बिघडू नये, असे आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.