रिॲलिटी चेक - एसटी - ना प्रवाशांची तपासणी, ना जंतुनाशकांची फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:05 AM2021-03-22T04:05:32+5:302021-03-22T04:05:32+5:30
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. एसटी प्रशासनाला मात्र त्याचे ...
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. एसटी प्रशासनाला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण प्रवाशांची कोरोना चाचणी सोडाच; पण एसटी गाड्या किंवा आगारात जंतुनाशकांची फवारणीही केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक अशा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील या महत्त्वाच्या शहरांतून मुंबईमध्ये शासकीय वा खासगी कामानिमित्त दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांची चाचणी करणे गरजेचे आहे. परंतु, एसटीच्या मुंबईतील आगारांमध्ये फेरफटका मारला असता तेथे परराज्य वा परजिल्ह्यांतून दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले. थर्मलगन किंवा ऑक्सिमीटरद्वारे प्राथमिक तपासणीही केली जात नाही. एकदा प्रवाशांना घेऊन आलेली गाडी पुन्हा मार्गस्थ होताना जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही. हजारो प्रवासी किंवा एसटी कर्मचाऱ्यांचा वावर असलेल्या आगारातही जंतुनाशके फवारली जात नसल्याचे दिसून आले.
आगारात दररोज किती प्रवासी आले, त्यांची नावे किंवा संपर्क क्रमांक यांचीही नोंद ठेवली जात नसल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्याचप्रमाणे सुरुवातीला दोन-तीन वेळा एसटी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली; परंतु गेल्या काही महिन्यांत चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले नसल्याची माहितीही त्याने दिली.