- लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळेनात; टॅक्सीचालकांची वणवण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर डोैलात धावणारी काळी-पिवळी म्हणजे या शहराचे आभूषण. मात्र कोरोनाने टॅक्सीच्या वर्दळीला ब्रेक लावल्यामुळे इथल्या ५० हजार टॅक्सीचालकांचे जीवन अंधकारमय झाले आहे. सध्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना प्रवाशांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे.
दादर परिसरात टॅक्सी चालविणाऱ्या रामजी यादव यांची स्थितीही याहून वेगळी नाही. ते सांगतात, एरवी माणसांची गजबज असलेल्या दादरची लॉकडाऊनमुळे पार रया गेली आहे. किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांशिवाय बाजारात कोणी येत नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी मुभा दिल्याने सर्वसामान्य नागरिक जवळच्या बाजारात जातात. दादरला येणारे स्वतःच्या वाहनांनी येतात. त्यामुळे आम्हाला प्रवासी मिळत नाहीत. पूर्वी सिद्धिविनायकसाठी तरी भाडी मिळायची; आता तीही बंद झाली आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाला ३०० रुपयांच्या वर कमाई झालेली नाही. इंधन, देखभाल आणि पार्किंगचे भाडे वजा केल्यास घरखर्च भागविण्यापुरते पैसेही उरत नाहीत. पद्मिनी टॅक्सी बंद केल्यामुळे नवीन गाडी घ्यावी लागली. तिचा हप्ता महिना १६ हजार रुपये. तो कुठून द्यायचा? हप्ता फेडण्यासाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये कर्ज काढले. आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यामुळे भीक मागण्याची वेळ आली आहे. आमची स्थिती पाहून सरकारला पाझर फुटो, अशी भावना यादव यांनी व्यक्त केली.