लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकांचे घर कोणते, माझे घर कोणते, हे बिबट्याला कळत नाही. मात्र, आपल्याला म्हणजे मनुष्यप्राण्याला यातला फरक नक्कीच कळतो. आपण नाही म्हटले तरी बिबट्या येणारच. तो सावधदेखील राहणार. गोरेगावमध्ये जो बिबट्या निदर्शनास आला तो वयाने मोठा असल्याचे लक्षात येते. त्याचे वय किमान सात वर्ष असावे. तो जेव्हा निदर्शनास आला तेव्हा त्याने कोणालाही त्रास दिलेला नाही. मात्र, आपण प्रगल्भ आहोत. आपण यादृष्टीने विचार केला पाहिजे. बिबट्याला त्याची हद्द माहीत नसणारच. बिबट्या भक्ष्याच्या शोधात इतरत्र येणारच. अशावेळी आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. कोणी कोठे अतिक्रमण केले? या विषयावर वाद घालून अथवा या विषयावर एकमेकांवर आरोप करून आपल्या हाती काही लागणार नाही. त्याऐवजी आपण यावर उपाय शोधले पाहिजेत, असे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या डॉ. विद्या अत्रेय यांनी सांगितले.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिबट्या निदर्शनास आल्यास त्याला त्रास देऊ नये. त्याचा पाठलाग करू नये, त्याला दगड मारू नये. आपण जर असे केले तर नक्कीच स्वतःच्या संरक्षणासाठी तो आपल्या अंगावर येईल. त्यामुळे या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळल्या पाहिजेत. जिथे बिबट्या निदर्शनास येतो, त्या भागात रात्री पुरेशी दिवाबत्ती असली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना रात्री एकटे सोडता कामा नये. येथे एक गोष्ट लक्षात घ्या. बिबट्या मनुष्यप्राण्याला घाबरतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची कोणती सीमा सुरक्षित आहे किंवा नाही, हा देखील मुद्दा नाही. तुम्ही जर पाहिले तर गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण कमी झाले आहे. जवळजवळ ते नाहीच. आता आपण सावध राहिले पाहिजे. बिबट्या आपल्याला त्रास देणार नाहीच. मात्र, उद्यानालगत जे परिसर आहेत ते स्वच्छ राहिले पाहिजेत. तेथे कचरा असता कामा नये. असे केले तर तेथे श्वानांची संख्या वाढते. घुस किंवा इतर घटकदेखील निदर्शनास येतात. याच कारणामुळे हे भक्ष्य ग्रहण करण्यासाठी बिबट्या आपल्याला मनुष्यवस्तीमध्ये आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपण उद्यानाच्या ज्या सीमा आहेत तेथे कचरा करु नये. आता उद्यानाबाबत बोलायचे झाले तर प्रशासन त्यांच्यापरिने काम करत आहे. त्यांची रेस्क्यू टीम खूप चांगले काम करत आहे. त्यांचा नियंत्रण कक्ष आहे. महाराष्ट्रात सर्वात चांगले काम येथे होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये प्रशासनाने खूप चांगले काम केले आहे. आता थोडी काळजी आपणदेखील घेतली पाहिजे, असेही डॉ. विद्या अत्रेय म्हणाल्या.