Join us

‘मोनो’च्या संचालनासाठी  पुन्हा कंत्राटदार नेमणार; एमएमआरडीएकडून निविदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:31 AM

चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

मुंबई : चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी निविदा मागविल्या असून, या कंत्राटदाराची १५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर धावणाऱ्या मोनो मार्गिकेची लांबी सुमारे १९.५ किमी असून त्यावर १७ स्थानके आहेत. सद्यस्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. त्यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते.

दर दिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत. त्यातून दर १८ मिनिटांनी या मार्गिकेवर गाडी धावत आहे. तर सद्यस्थितीत प्रवाशांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे मोनो मार्गिका आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे. आता या मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन १० गाड्यांची खरेदी एमएमआरडीएने सुरू केली आहे. त्यातील पहिली गाडी मुंबईत दाखल झाली आहे. या गाड्या प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर गर्दीच्या वेळी मोनो मार्गिकेवर दर ६ मिनिटांनी गाडी धावू शकणार आहे. त्यातून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी अशा एमएमआरडीएकडून व्यक्त केली जात आहे.

निविदेसाठी ११ जूनपर्यंत मुदत -

मोनो मार्गिकेचे संचालन आणि देखभालीसाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला मोनोच्या संचालनासह तिकीट गोळा करावी लागणार आहे. तसेच मार्गिकेची देखभालीची कामे करावी लागणार आहेत. यासाठी ११ जूनपर्यंत निविदा भरता येणार आहेत.

टॅग्स :मुंबईएमएमआरडीएमोनो रेल्वे