शाकाहारी अभ्यासक्रमास कारण की...
By admin | Published: October 9, 2016 01:27 AM2016-10-09T01:27:57+5:302016-10-09T01:48:44+5:30
हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेताना विद्यार्थ्यांना शाकाहारासोबत मांसाहाराचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. त्यामुळे शुद्ध शाकाहारी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा
- चेतन ननावरे
हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेताना विद्यार्थ्यांना शाकाहारासोबत मांसाहाराचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. त्यामुळे शुद्ध शाकाहारी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असतानाही या क्षेत्राकडे पाठ फिरवावी लागते. ही उणीव दूर व्हावी म्हणून एका पालकाने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये केवळ शाकाहाराचा पर्याय उपलब्ध असावा, या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी आॅनलाइन कॅम्पेन सुरू केले.
त्या कॅम्पेनची दखल घेत आजघडीला शासनाने ३ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थांमध्ये शाकाहाराचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आणखी १८ संस्थांमध्ये या केवळ शाकाहार प्रशिक्षणाचे धडे गिरविता येणार आहेत. नेमक्या काय मागण्या केल्या आहेत त्या पालकाने, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
राज्यातच नव्हे, तर देशात शाकाहारी व्यक्तींची संख्या मांसाहारी व्यक्तींहून अधिक आहे. धार्मिक पर्यटनस्थळांनजीकच्या हॉटेलची पाहणी केली, तर निश्चितच ९९ टक्के हॉटेल्स ही शुद्ध शाकाहारी असतात. मात्र या हॉटेलमधील आचारी किंवा शेफबाबत प्रश्नचिन्ह कायम असते. कारण केवळ शाकाहाराचे प्रशिक्षण देणाऱ्या पदवी प्रशिक्षणाची कमतरता शिक्षण व्यवस्थेमध्ये होती. ही कमतरता दूर करण्याचा विचार पुण्यातील चंद्रशेखर लुनिया यांनी केला आणि आॅनलाइन याचिकेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले.
व्यवसायाने सीए असलेल्या लुनिया यांच्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घ्यायची इच्छा होती. मात्र शाकाहाराचे व्रत घेतलेल्या कुटुंबात मांसाहाराचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे केवळ शाकाहाराचे प्रशिक्षण मिळेल, अशा संस्थेचा शोध लुनिया यांनी सुरू केला. मात्र राज्यातच नव्हे, तर देशात त्यांना अशी संस्था मिळाली नाही. आणि केवळ शाकाहाराचा पर्याय उपलब्ध व्हावा, म्हणून त्यांनी लढा सुरू केला. आजघडीला सुमारे ४ हजारांहून अधिक नागरिकांनी ही याचिका केली आहे.
दरम्यान, लोकसभेसह राज्यसभेतील सर्व खासदारांना निवेदन देत चंद्रशेखर लुनिया यांनी केंद्रीय संस्था आणि देशातील सर्व विद्यापीठांत शाकाहाराचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी केली. लोकसभा आणि राज्यसभेत मागणीचा पाठपुरावा व्हावा, म्हणून लुनिया यांनी दोन वर्षांत तब्बल तीनवेळा प्रत्येक खासदारास निवेदन देण्याचे काम केले. काही खासदारांनी लुनिया यांची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत सातत्याने लावून धरली. अखेर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने या मागणीची दखल घेत भोपाळ, अहमदाबाद आणि जयपूर या ठिकाणच्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहाराचे धडे देण्याची सुरुवात केली. तर मनुष्यबळाअभावी पुढील शैक्षणिक वर्षापासून १८ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहाराचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसे पत्रही शासनाने लुनिया यांना पाठवले आहे. मात्र केवळ केंद्रीय संस्थांपुरते मर्यादित न राहता हा अभ्यासक्रम सर्व राज्यांत लागू करावा, यासाठी लुनिया यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शाकाहार का आवश्यक आहे, यावर नजर टाकल्यास वस्तुस्थिती समजू शकेल.
देशात बहुसंख्य समुदाय, जात, धर्म आणि पंथातील नागरिक हे संपूर्ण शाकाहारी आहेत; शिवाय ते केवळ शाकाहारी आहार पसंत करतात.
पर्या$यी शिक्षण व्यवस्थेकडे जाताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी असावी. मात्र मांसाहाराचे बंधन असल्याने देशातील मोठ्या संख्येने युवक हॉटेल मॅनेजमेंट पदवीपासून वंचित राहत आहेत.
यामुळे भारतीय शाकाहारी खाद्य संस्कृती जगभर पोहोचण्यास मदत होईल.
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जेवण तयार करण्यासह फ्रंट आॅफिस, अकॉमॉडेशन, कायदे, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, एचआर मॅनेजमेंट, अकाउंटिंग असे ४०हून अधिक विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. सध्याच्या अभ्यासक्रमामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना या विषयांनाही मुकावे लागत आहे. त्यामुळे या क्षेत्रांमधील संधीपासूनही ते वंचित राहत आहेत.
अनेक नामांकित हॉटेल, एअर लाइन्स आणि कंपनीमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण पुरविले जाते. त्या ठिकाणी विश्वासार्ह आचारी आणि शाकाहारी वैविध्यता पुरवता येईल.
मांसाहाराच्या तुलनेत शाकाहाराला आयुर्वेदाने अधिक उजवे मानले आहे; शिवाय तुलनेत शाकाहारी जेवण अधिक स्वस्त असते.
गृहिणींनाही याचे प्रशिक्षण मिळाल्यास खानावळीच्या माध्यमातून त्या रोजगार निर्माण करू शकतात. त्याचा फायदा आयआयटी, मल्टीनॅशनल कंपनी यांसारख्या ठिकाणी येणाऱ्या शाकाहारी विद्यार्थी - कामगारांना होऊ शकतो.