Join us

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

By admin | Published: October 27, 2015 1:38 AM

रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केटला लागलेल्या आगीचे कारण २४ तासांहून अधिक काळ लोटून गेला तरीही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबई : रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केटला लागलेल्या आगीचे कारण २४ तासांहून अधिक काळ लोटून गेला तरीही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिक, दुकानदारांनी वर्तवला असून आगीच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. क्रॉफर्ड मार्केटला लागलेल्या आगीत ६० हून अधिक गाळे जळून खाक झाले आहेत. आग पसरू नये म्हणून सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काम केल्यामुळे जीवितहानी टळली आणि आगीवर नियंत्रण आणणे सोपे गेले. क्रॉफर्ड मार्केटची रचना ही दाटीवाटीची आहे. चिंचोळ्या गल्ल्या, चिकटून असलेले गाळे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे कठीण जाते. येथील दुकानदार, व्यावसायिकांनी आगप्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. याआधीही मोठ्या प्रमाणात क्रॉफर्ड मार्केटला आग लागली होती. त्या वेळीही लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आग लागलेल्या गाळ्यांमध्ये कडधान्य, इलेक्ट्रिक वायर, परफ्यूम, ड्रायफ्रूट, चॉकलेट इत्यादी दुकाने होती. पण आग कशामुळे लागली याविषयी कोणतीही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. याचा शोध सुरू आहे. येत्या २-३ दिवसांत आगीचे कारण स्पष्ट होईल, असे रहांदळे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)