Join us

मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 7:41 AM

राज्य निवडणूक कार्यालय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मनोज मोघे -मुंबई : मतदानासाठी नागरिकांना झालेला विलंब, मतदान केंद्रांवरील गैरसोयीबाबत चौकशी करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मात्र, तत्पूर्वीच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या सर्व प्रकाराची कारणमीमांसा करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुंबई, ठाणे व पालघरमधील ज्या मतदारसंघात विलंब झाला, तेथील रिटर्निंग ऑफिसरला फोन करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज्य निवडणूक कार्यालय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.मतदान केंद्रांवरील गोंधळाबाबत उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबाबत चौकशी केली जाईल, असे  सांगितले. मात्र, तसे आदेश मिळाले नाहीत. गैरसोयीबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले जात होते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टक्का घसरला; चौकशीचे आदेशराज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईतील अनेक भागात संथगतीने मतदान झाल्याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूक 2024