मुंबई : पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये गुरुवारी रात्री अचानक गॅसची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विविध आपत्कालीन पथकांनी तपास केला असता त्यांना कोठेही गॅसगळती झाल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे उपनगरांत पसरलेल्या दुर्गंधीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.गुरुवारी रात्री चेंबूर, मानखुर्द, विक्रोळी, घाटकोपर, पवई, चकाला, गोरेगाव व आरे कॉलनी येथून अग्निशमन दलाला वायुगळतीच्या अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर अग्निशमन दलामार्फत मुंबईतील विविध भागांत पाहणी करण्यात आली. परंतु वायुगळती नेमकी कोठून होत आहे याची माहिती मिळाली नाही. चेंबूरमध्ये काही लोकांनी आरसीएफ कंपनीवर गॅसगळतीचा आरोप लावला, परंतु मुंबई पोलीस, अग्निशमन दल व एनडीआरएफने आरसीएफ कंपनीमध्ये पाहणी केली असता त्यांना कोणतीच वायुगळती सापडली नाही. तसेच महानगर गॅसच्या आपत्कालीन पथकानेही गॅस प्रकल्पाची रात्रभर पाहणी केली असता कोणतीच वायुगळती न सापडल्याने गॅसगळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.गुरुवारी रात्री गॅसची दुर्गंधी येताच नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्या मुंबई पोलीस व महानगरपालिकेला टॅग केल्या. रात्री वातावरणात अचानक गॅसची दुर्गंधी येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शुक्रवारी परिस्थिती सामान्य झाली असली, तरी महानगरपालिका व अग्निशमन दलाने मुंबईतील केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.>हॅजमॅटद्वारे गॅसगळतीची तपासणीअग्निशमन दलाने ठिकठिकाणी अत्याधुनिक हॅजमॅट वाहनांच्या साहाय्याने गॅसगळतीची तपासणी केली. शुक्रवारी दिवसभर मुंबईच्या विविध भागांत गॅसगळती झाल्याचा शोध घेतला जात होता. मात्र कुठेही गॅसगळती झालेली आढळली नाही.>तातडीची बैठकअतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी आपल्या दालनात शनिवारी दुपारी गॅस कंपन्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तसेच संबंधित कंपन्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकालाही खबरदारी म्हणून सतर्क करण्यात आले आहे.>‘आरसीएफमध्ये गॅसगळती नाही’राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) चेंबूर प्लांटमध्ये गॅसगळती झाल्याची आॅनलाइन तक्रार आली होती. त्यानुसार त्या ठिकाणी तपासणी केली असता गळती झाली नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
उपनगरातील गॅसगळतीचे कारण अद्याप अस्पष्ट; आपत्कालीन पथकांकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:28 AM