मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असताना, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यन्त १० हजार १११ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर सदयस्थितीत २९० अधिकाऱ्यांसह १९६६ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या विविध नियमांचे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. आतापर्यन्त पोलिसांकड़ून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ३० हजार २०६ गुन्हे नोंद केले आहेत. तर ३३ हजार ५०७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर विविध कारवाईत तब्बल ९५ हजार ८२२ वाहने पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान राज्यभरात १८ ऑगस्ट पर्यंत १२ हजार ४९५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात १३०२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे १००० अधिकाऱ्यांसह ९ हजार १११ असे एकूण १० हजार १११ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी बरेच जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. सदयस्थितीत २९० अधिकाऱ्यांसह १९६६ पोलिसांवर असे एकूण २ हजार २५६ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
१२८ पोलिसांना गमवावा लागला जीव : यात धक्कादायक बाब म्हणजे या लढ्यात आतापर्यंत १२ अधिकारी आणि ११६ पोलिसांना जीव गमाविण्याची वेळ ओढावली आहे. यात मुंबई पोलीस दलातील ५७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.