मुंबई- शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आमच्या सारख्या तीन तीन टर्म आमदार राहिलेल्या पक्ष संघटनेचे काम केलेल्यांना जर गद्दार म्हणत असतील तर दुर्दैव असल्याचं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भाषा बोलू नये. तुम्ही सुसंस्कृत भाषा बोला. त्यांना संजय राऊतांचा सहवास असल्यामुळे हे ऐकण्यास आम्हाला वाईट वाटतं, असं शंभूराजे देसाईंनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या मनाने आमच्या सरकारला आशिर्वाद द्यावा. तसेच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना फोन केला की नाही हे माहिती नाही. मात्र आम्ही रविवारी देवेंद्र फडणविसांची भेट घेणार आहोत, असं शंभूराजे देसाईंनी सांगितलं.
आम्हाला हिणवले तर आणखी स्फोट होतील. आमच्या मनात आणखी खूप काही आहे, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी दिला. आणखी काही गोष्टी आहेत त्या आम्ही उघडपनाने बोलू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आदेश आहेत. अडीच वर्षात खूप काही साठले आहे, असं शंभूराजे देसाईंनी सांगितले. आमच्या मनात साठवून ठेवायची काही मर्यादा आहेत. जर मर्यादा संपली, तर ५० आमदार आणि १२ खासदार यांच्या मनातल्या व्यथा साठलेले कटू अनुभव आम्हाला उघड करावे लागतील, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी यावेळी दिला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या चाळीस आमदारांवर टिकेची झोड उठवली. त्यांना पक्षाच्या माध्यमातुन ख्याती मिळवून दिली. आमदारकी, मंत्रीपदे दिली. मग यात आमचे काय चुकले? भरभरुन प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केला आहे. तसेच हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा द्या व पुन्हा जनतेसमोर या, जनतेचा न्यायनिवाडा आम्हाला मान्य असेल, असे खुले आव्हान देखील ठाकरे यांनी केले.
एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली- आमदार सुहास कांदे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे सुहास कांदे म्हणाले होते.