Maharashtra Political Crisis: “प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 09:45 AM2022-08-13T09:45:47+5:302022-08-13T09:46:11+5:30
Maharashtra Political Crisis: दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील संघर्षाचा आता पुढचा टप्पा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना भवनातून शिवसेनेला दिशा देणारे अनेक निर्णय, घोषणा आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंनी केल्या. शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गटही सरसावला आहे. दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, यावर शिंदे गटातील एका बंडखोर आमदाराने स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी ट्वीट केले आहे. प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधत असल्याचे स्पष्टीकरण सामंतांनी दिले आहे. प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे, असे उदय सामंत म्हणाले आहेत.
शिवसेना भवनबद्दल आम्हाला कायम आदर
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील, असे ट्विट उदय सामंत यांनी केले आहे. दुसरीकडे, शिंदे गट दादरमध्ये आपले मध्यवर्ती कार्यालय उभारणार असला तरी त्यांना या कार्यालयाला शिवसेना भवन नाव देता येणार नाही. शिवसेना भवन, शिवालय, शिवसेना शाखा हे शिवसेनेशी संबंधित शब्द आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयाचे नाव काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतील या कार्यालयाचे नाव ते स्वतःच ठरवणार आहेत.
दरम्यान, दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार आहे. या कार्यालयात लोकांना आपल्या समस्या घेऊन तिथले शिंदे गटाचे नगरसेवक, आमदार, पदाधिकारी यांना भेटता येईल, अशी यामागची कल्पना आहे. अशा प्रकारे मूळ शिवसेना फोडून शिंदे गट मोठा करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे.