Join us

Sanjay Raut: आधी 'बंडखोर', आता 'आमचे जुने सहकारी'; संजय राऊत यांचा सूर बदलला, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 12:03 PM

राज्यात राजकीय उलथापालथ झाली याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचं शिंदे गटातील आमदार बोलू लागले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच असा निर्णय घ्यावा लागला.

मुंबई-

राज्यात राजकीय उलथापालथ झाली याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचं शिंदे गटातील आमदार बोलू लागले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच असा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे. त्यामुळे शिवसेनेला वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं असा सूर शिवसेनेच्या आमदारांनी आळवला आहे. महत्वाची बाब म्हणजे आमदारांच्या थेट घणाघाती आरोपांनंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर न देता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली आहे. इतकंच काय आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांना बंडखोर म्हणण्याऐवजी 'आमचे जुने सहकारी' म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया ऊंचावल्या आहेत.

संजय राऊत आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांना बंडखोर म्हणणं टाळलं. राऊतांच्या याच भूमिकेनं सर्वांना लक्ष वेधून घेतलं. तसंच आमदारांकडून त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचंही त्यांनी आक्रमकपणे उत्तर न देता सामंजस्याच्या भूमिका घेताना दिसले. 

"...मग मोदींचं काय?", शहाजी बापू पाटील यांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर! 

"जेव्हा आमदार सूरतला गेले तेव्हा हिंदुत्वासाठी निर्णय घेतला असं म्हणत होते. नंतर ते निधी मिळत नव्हता असं म्हणू लागले आणि आता आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना सोडली असं म्हणू लागले आहेत. माझा त्यांना एकच सल्ला राहील त्यांच्या नेत्यांनी या आमदारांची एक बैठक घ्यावी आणि नेमकं कारण काय ते ठरवावं. आजही ते आमचे आहेत. एका नात्यानं आम्ही बांधले गेलो आहोत. पण त्यांनी एका कारणावर ठाम राहावं", असं संजय राऊत म्हणाले. 

शरद पवारांच्या भेटीलासंजय राऊत आज सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना आमची महाविकास आघाडीच्या वर्तमान आणि भविष्यासह सर्वच बाबींवर चर्चा झाली. यापुढेही होत राहील, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं. 

शहाजी बापू पाटील यांनाही प्रत्युत्तर"शहाजी बापू पाटील आधी कुठं होते? ते आता शिवसेनेत आलेत. मी काय मोदीही शरद पवारांचं कौतुक करतात. शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं मोदी म्हणतात. मग मोदींना तुम्ही असंच म्हणणार का? ते काय झाडी, काय डोंगर ते सारं ठिक आहे. त्यापुढे किती खोकी असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

काय म्हणाले होते शहाजी बापू पाटील?सांगोलच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांच्यावर टीका केली. "संजय राऊत रोज सकाळी उठतात आणि कचाकचा बोलतात. आग लावून देतोत. त्यांना आधी कुलूप लावून बंद करा. आम्ही घरातून बाहेर पडलो की सकाळसकाळ आमच्या डोक्याला टेन्शन येतं. सारखं टीव्हीवर येऊन पवार साहेब जागतिक नेते, पवार साहेब आमचे नेते असं कौतुक करत असतात मग त्यांनी तिथंच जावं की. शिवसेनेचे प्रवक्ते आहात तर उद्धव साहेबांबद्दल बोला की. नाहीतर आम्हाला आमच्या साहेबांबद्दल बोलू द्या", असं शहाजी बापू म्हणाले होते. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरे