Join us

महाआघाडीत जागांचा घोळ; महायुतीत बंडखोरी! धारावी, मानखुर्द, मुलुंड, भायखळ्यात पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:17 PM

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम होता.

मुंबई :

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम होता. भायखळा येथून उद्धवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. तर धारावीत काँग्रेसच्या विरोधात उद्धवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. 

धारावीतून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड रिंगणात आहेत. अर्ज भरताना त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे नेते आणि माजी आ. बाबूराव माने होते. मात्र, जागावाटपाच्या गोंधळात उद्धवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर माने यांनी अर्ज भरल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातून धारावीत शिंदेसेनेचे राजेश खंदारे, काँग्रेसच्या ज्योती गायकवाड आणि उद्धवसेनेचे बाबूराव गायकवाड अशी लढत होईल. भायखळा येथून उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांच्याविरोधात काँग्रेसकडून मधुकर चव्हाण, तर समाजवादी पक्षाकडून सईद खान यांनी अर्ज भरला आहे. त्यातून या मतदारसंघातही तिढा वाढला आहे. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्याविरोधात वसीम खान यांनी काँग्रेसकडून, तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज भरला आहे. मुलुंडमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संगीता वाजे आणि काँग्रेसच्या राकेश शेट्टी यांनी अर्ज भरला आहे. 

अंधेरी पश्चिममध्ये काँग्रेसमध्येच बंडखोरी सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहसिन हैदर यांनी बंडखोरी करीत अंधेरी पश्चिम येथून अपक्ष अर्ज भरला.  त्यामुळे भाजपचे आ. अमित साटम, काँग्रेसचे अशोक जाधव आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मोहसिन हैदर आमनेसामने आले आहेत.अंधेरी पूर्वमध्ये शिंदेसेनेत बंडखोरीअंधेरी पूर्वमध्ये शिंदेसेनेत बंडखोरी करून माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष अर्ज भरला. त्या शिंदेसेनेकडून इच्छुक होत्या.  आता शिंदेसेनेचे मुरजी पटेल, उद्धवसेनेच्या ऋतुजा लटके आणि स्वीकृती शर्मा यांच्यात लढत होईल.

वांद्रे पूर्वमध्ये महायुतीत बिघाडीवांद्रे पूर्वमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आ. झिशान सिद्दिकी यांच्याविरोधात शिंदेसेनेचे कुणाल सरमळकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यातून येथेही महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबईअंधेरी पूर्वअंधेरी पश्चिम