बंडातात्यांच वक्तव्य संतापजनक, महिला आयोगाचे पोलिसांना कडक निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:32 AM2022-02-04T10:32:22+5:302022-02-04T10:37:42+5:30
बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती
मुंबई - सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना पहायला मिळत असून. गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, महिला आयोगानेही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले आहेत.
बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधत अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात महिला आयोगाने गंभीर दखल घेत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ''बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन त्याचा अहवाल 48 तासांच्या आत आयोगास सादर करावा,'' असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच बंडा तात्या कराडकर यांनी 7 दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा,'' असेही त्यांनी म्हटले आहे.
त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडा तात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा@SataraPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 3, 2022
काय म्हणाले होते बंडातात्या
सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.
वाईन धोरणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका
किराणामाल दुकानांमध्ये वाइन विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात राज्य सरकारवर आंदोलन करून तीव्र स्वरूपात आसूड ओढले. शासनाचे वाइन धोरण म्हणजे ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' असे आहे, त्यातला ढवळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्यांना त्यांचा जास्त गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.. असे म्हणत कराडकर यांनी शासनाच्या वाईन धोरणाचा समाचार घेतला. राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे गुरुवारी साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले.
दारू विक्री करणारी किराणा दुकाने जाळू : कराडकर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. शेतकऱ्यांच्या मालाची इतकी काळजी असेल तर द्राक्ष आणि तत्सम फलोत्पादन यांचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. दारूविक्री माता-भगिनी आणि महिलांचे संसार धुळीला मिळाले आहेत तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर गावागावातील वारकरी ते दुकान जाळल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.