नामदेव मोरे, नवी मुंबईबंडखोरांमुळेच शिवसेना - भाजपाचे महापालिकेमध्ये सत्ता मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले असून, शिवसेनेलाही धक्का बसला आहे. शिवसेना व भाजपाने राष्ट्रवादी व काँगे्रसमध्ये फूट पाडण्याचा सपाटा लावला होता. दिग्गज नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे व स्वत: गणेश नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यामुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली होती. सरकारने मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव एफएसआय व गावठाणांसाठी क्लस्टरची घोषणा करून नागरिकांची मने जिंकली होती. परंतु युतीची घोषणा, जागावाटप व तिकिटांच्या घोळामुळे दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली. शिवसेनेच्या ४० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली. भाजपाच्या बहुतांश प्रभागांमध्ये सेनेचे बंडखोर उमेदवार उभे होते. प्रभाग ५१ मध्ये भाजपाचे स्थानिक नेते वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांचा पराभव सेनेच्या बंडखोर उमेदवारामुळे झाला. प्रभाग ५० मध्ये वैभव पाटील यांचा पराभव बंडखोर हरिभाऊ म्हात्रेंमुळेच झाला आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सीव्हीआर रेड्डी, उमा घाटे, नेहा होनराव या भाजपाच्या उमेदवारांचा पराभव बंडखोरांमुळेच झाला. शिवसेनेलाही याचा फटका बसला आहे. घणसोली प्रभाग ३१ मध्ये सीमा गायकवाड या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार जिंकल्या. प्रभाग ७३ मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा चव्हाण व भाजपाच्या संगीता सुतार या बंडखोर उमेदवारांमुळे अदिता वाघमारे यांचा पराभव झाला. सानपाडा प्रभाग ७६ मध्ये शिवसेनेच्या विद्या पावगे यांच्यापेक्षा शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार सुभद्रा पाटे यांना जास्त मते मिळाली. अनेक प्रभागांमध्ये बंडखोरांमुळे युतीचे उमेदवार पडले आहेत. भाजपाला युतीचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकाऱ्यांना गृहित धरणे सेनेला महागात पडले व सत्तेचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
बंडखोरांनी दिला युतीला धोबीपछाड
By admin | Published: April 25, 2015 4:48 AM