Join us

प्राचार्यास लाच स्वीकारताना अटक

By admin | Published: April 22, 2015 10:43 PM

माणगाव तालुक्यातील निजामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्राचार्य रामदास पुंडलिक पगारे यास बुधवारी तीन हजारांची लाच

अलिबाग : माणगाव तालुक्यातील निजामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्राचार्य रामदास पुंडलिक पगारे यास बुधवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. मूळ नाशिक येथील रामदास पुंडलिक पगारे हे निजामपूर येथील या आयटीआयमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत होते. याच आयटीआयमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत एका कर्मचाऱ्याचा सात महिन्यांपासूनचा पगार थकीत होता. हा थकीत पगार देण्याकरिता प्राचार्य पगारे याने तीन हजार रुपयांची मागणी त्या सुरक्षारक्षकाकडे केली होती. अनेकदा विनंती करुनही प्राचार्य पगारे लाचेची रक्कम कमी करण्यास तयार नव्हता. अखेर या सुरक्षा रक्षकाने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयात या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली. बुधवारी आयटीआयमध्येच रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला. त्यात प्राचार्य पगारे रंगेहाथ सापडला आहे. पगारे यांच्या निजामपूर व मूळ गाव असलेल्या नाशिक येथील घराची झडती घेण्याचे तसेच संबंधित कागदपत्रे तपासण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.