Join us

मिळाले ३२ कोटी, बनावट कंपन्यांत फिरविले २४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:21 AM

सुजित पाटकरबाबत ईडीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड काळात वरळी आणि दहिसर येथे उभारलेल्या जम्बो कोविड केंद्रात वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम ज्या लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले, त्या कंपनीने पालिकेकडून त्यांना मिळालेल्या ३२ कोटींपैकी केवळ आठ कोटी खर्च केले. उर्वरित २४ कोटी हडपल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणी ईडीने बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर व पालिकेचे डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली.

उपलब्ध माहितीनुसार, लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीची स्थापना २०२० मध्ये झाली. कंपनी स्थापन झाल्यापासून महिन्याच्या आत कोणताही पूर्वानुभव नसताना कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या दोन्ही केंद्रांवर वैद्यकीय सेवा, डॉक्टर, नर्सेस पुरवण्यासाठी कंपनीला एकूण ३२ कोटी रुपये पालिकेकडून प्राप्त झाले. मात्र, त्या कोविड केंद्रांमध्ये जेवढ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यापैकी केवळ ५० ते ६० टक्केच डॉक्टर व अन्य कर्मचारी नियुक्त केले होते. उर्वरित लोकांची बोगस उपस्थिती दाखवत कंपनीने बनावट बिले सादर करीत पालिकेकडून पैसे उकळल्याचा आरोप ईडीने ठेवला.

कंपनीला जे ३२ कोटी रुपये प्राप्त झाले, त्यापैकी केवळ आठ कोटी कोविड केंद्रावरील कामासाठी खर्च केले. उर्वरित २४ कोटी बनावट कंपन्यांद्वारे फिरवून स्वतःसाठी वापरल्याचा ठपका ईडीने ठेवला. हे पैसे कसे व कुठे फिरले, ते कुणाला मिळाले, याचा पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :शिवसेनाअंमलबजावणी संचालनालयमुंबईकोरोना वायरस बातम्या