पुलाअभावी रहिवाशांचे हाल
By admin | Published: May 29, 2017 06:51 AM2017-05-29T06:51:01+5:302017-05-29T06:51:01+5:30
बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चुनापाडा येथील दहिसर नदीवर पूल नसल्याने आदिवासी बांधवांचे ऐन पावसाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चुनापाडा येथील दहिसर नदीवर पूल नसल्याने आदिवासी बांधवांचे ऐन पावसाळ्यात हाल होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पूल नसल्याने रहिवाशांचा पावसाळ्यात बाहेरील घटकांशी संपर्क तुटत आहे. येथे पूल बांधण्यात यावा यासाठी येथील महिला मंडळासह कार्यकर्त्यांनी कित्येक वेळा वनविभागाची भेट घेतली आहे. मात्र काहीच कार्यवाही होत नसल्याने आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वास्तव्य करत असलेले आदिवासी हे येथील मूळ रहिवासी आहेत. नॅशनल पार्कात जवळजवळ ११ आदिवासी पाडे आहेत. त्यामधला चुनापाडा हा दहिसर नदीला लागून असल्याने पावसाळ्यात जेव्हा दहिसर नदी तुडुंब भरते, त्या वेळी पाड्याचा इतर लोकांशी संपर्क तुटतो. लहान मुलांची ४ महिने शाळा बंद होते. तसेच महिला आणि पुरुषांना कामासाठी बाहेर जाता येत नाही.
आदिवासी समाजातील चिंचपाडा आदिवासी महिला मंडळाने यासंबंधी नॅशनल पार्कातील अधिकाऱ्यांकडे नदीच्या पुलासंबंधी पत्रव्यवहार केले. परंतु अद्यापही त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात येत नाही. पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना काहीच कार्यवाही करण्यात येत नाही. परिणामी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
दरम्यान, तात्पुरती उपाययोजना म्हणून नदीवर मोठे लोखंडी रॉड टाकून प्रश्न सोडविला जात आहे. मात्र हा उपाय कायमचा नाही. या कारणास्तव आदिवासी बांधवांच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि येथे पूल बांधण्यात यावा, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आम्ही सर्व नागरिक आणि महिला मंडळ वनअधिकाऱ्यांकडे गेलो. तेव्हा आम्ही चुनापाड्यातील पुलाची समस्या त्यांना सांगितली. समस्येचे व्हिडीओ दाखवले गेले. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की पावसाच्या आधी तुम्हाला पूल बांधून देतो. अद्याप पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळालेला नाही. पावसात सामान्य लोकांचे खूप हाल होतात. लोकांचा पावसाळा संपेपर्यंत संपर्क तुटतो. तरी त्वरित पावसाच्या आधी पूल बांधण्यात यावा.
- देवेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बिरसा मुंडा आदिवासी विकास संघर्ष समिती, नॅशनल पार्क
चुनापाड्यातील पूल गेल्या ४ वर्षांपासून पाहतोय. गेल्या महिन्यात आम्ही वनअधिकाऱ्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी पुलांसंबंधी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पुलासंबंधी प्रस्ताव दिला गेलेला असल्याचेदेखील सांगितले गेले. तरीदेखील अजून काम सुरू झालेले नाही. वन प्रशासनाने किंवा शासनाने हा प्रश्न सोडवावा.
- प्रमोद शिंदे,
सामाजिक कार्यकर्ता