ज्येष्ठ नागरिकांचे झाले हाल

By admin | Published: November 13, 2016 04:14 AM2016-11-13T04:14:06+5:302016-11-13T04:14:06+5:30

सकाळी उठायला कंटाळा करणाऱ्या व्यक्तीही गुरुवार सकाळपासून बँक अथवा एटीएमच्या रांगेत उभ्या दिसत आहेत. चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलण्यासाठी अथवा बँकेतून

Recent cases of senior citizens | ज्येष्ठ नागरिकांचे झाले हाल

ज्येष्ठ नागरिकांचे झाले हाल

Next

मुंबई : सकाळी उठायला कंटाळा करणाऱ्या व्यक्तीही गुरुवार सकाळपासून बँक अथवा एटीएमच्या रांगेत उभ्या दिसत आहेत. चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलण्यासाठी अथवा बँकेतून पैसे काढण्यासाठी मुंबईकरांची लगीनघाई सुरू आहे. शहरात सगळ्याच बँकांमध्ये, एटीएम मशिनसमोर गर्दीत भरडल्या जाणाऱ्या ज्येष्ठांकडे मात्र बँकांनी दुर्लक्षच केले आहे. हातावर मोजण्याइतक्या बँका सोडल्यास, कोणत्याही बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग अथवा सोय केली नसल्याने, ज्येष्ठ नागरिक त्रस्त असल्याचे हेल्प एज इंडियाचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे घोषित केले. त्यानंतर, सर्वच जण चिंतेत दिसून आले. घरात, पाकिटात किती पैसे आहेत, याची चाचपणी केली आणि पुढचे नियोजन आखायला सुरुवात झाली. त्यानंतर, बुधवारी बँका बंद असल्यामुळे आहे त्या पैशातच मुंबईकरांनी दिवस ढकलला, पण गुरुवारी बँका उघडल्यावर बँकांमध्ये झुंबड उडाली आहे. सकाळी साडेसहा-सात वाजल्यापासून रांगा लागण्यास सुरुवात होते, पण तरीही साडेतीन-चार तास प्रतीक्षा करावीच लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारात ज्येष्ठ नागरिक भरडून निघाले आहेत. (प्रतिनिधी)

- एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक हे भाज्या रोजच्या रोज आणतात. त्यांना लागणारी औषधे अथवा काही वस्तू या आठवड्यापुरत्याच आणलेल्या असतात. औषधांच्या दुकानांमध्येही ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यानेही ज्येष्ठांचे हाल होत आहेत. उन्हात रांगेत उभे राहिल्यामुळे पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रासही ज्येष्ठांना होत आहे. पैसे मिळत नसल्याने त्यांचा मानसिक त्रासही वाढला आहे.

- काही बँकांनी ज्येष्ठांसाठी काही सोयी केल्या आहेत. या बँकांमध्ये ज्येष्ठांना तत्काळ आत सोडले जाते, पण अन्य ठिकाणी ज्येष्ठ नागरिक ताटकळतच उभे असतात. बँकांबरोबरच बिल भरण्यासाठीही रांगा लागल्या आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांकडे आता चलनातील पैसे नसल्याने, वस्तू दुकानदाराकडून उसन्या घ्याव्या लागत आहेत. पैसे असूनही खर्च करता येत नसल्याने, ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्नाकडे बँक प्रशासन आणि सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत बोरगावकर यांनी व्यक्त केले.

३९ टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. अशा ज्येष्ठांचा त्रास अधिक वाढला आहे. या नागरिकांकडे ५०० आणि हजारच्या नोटा आहेत. सुटे पैसे नसल्याने बॅँकेपर्यंत जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी मिळत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या दोन दिवसांपासून दोन-अडीच तास रांगेत उभे राहिले आहेत, पण त्यांचा नंबर यायच्या आधीच बँक बंद होते अथवा एटीएम मशिनमधले पैसे संपतात. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना घरी परतण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

Web Title: Recent cases of senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.