- मनोहर कुंभेजकरमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मात्र, येत्या रविवार दि. 29 सप्टेंबर पासून मुंबईत नवरात्रीगरबा-दांडिया उत्सवाला सुरवात होणार आहे. मात्र, आर्थिक मंदीचा मोठा फटका मुंबईतील नवरात्री व गरबा-दांडिया उत्सवांना बसला आहे. यंदा गरबा व दांडियाच्या तिकिटांच्या दरात देखिल आयोजकांनी 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी मोठी गर्दी यंदा कशी होईल आणि उत्सवावर होणारा खर्च कसा निघेल या चिंतेत सध्या आयोजक आहेत.
पश्चिम उपनगरात जुहू,वर्सोवा,मालाड,कांदिवली व बोरिवली येथे दरवर्षी गरबा-दांडिया उत्सव उत्साहात साजरा केला जातो.मात्र उपनगरातील शिवसेना व भाजपा युतीच्या विद्यमान आमदारांसह काँग्रेस आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी सुद्धा गरबा-दांडिया उत्सव मंडळांना आर्थिक मदतीसाठी आखडता हात घेतला आहे.त्यातच मंडळांना नेहमी बिल्डर व उद्योजक,व्यापारी व हितचिंतकांकडून तसेच जाहिरतदारांकडून मदत आर्थिक मंदीमुळे मंदावली आहे.त्यामुळे यंदाच्या नवरात्र व गरबा-दांडिया उत्सवाला आर्थिक मंदीचे सावट असल्याची माहिती उपनगरातील आयोजकांनी लोकमतशी बोलतांना दिली.
शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,गेली 12 वर्षे बोरीबली पूर्व,देवीपाडा येथे साजरा होणारा दहीहंडी उत्सव आम्ही रद्ध करून शिवसेना पूरग्रस्त साहाय्यता निधीला मदत केली.मात्र यंदा आर्थिक मंदीची मोठी लाट असल्याने पश्चिम उपनगरातील गरबा व दांडियावर मंदीचे सावट असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम उपनरातील काँगेसच्या इच्छुक उमेदवारांने लोकमतला सांगितले की,मला तर तिकीट मिळणार आहे,मात्र निवडणुकीसाठी पैसा पक्ष देणार नाही. त्यातच नवरात्री उत्सव व दांडिया व गरबा मंडळे देणगीसाठी मदतीचा हात पुढे करतात. आर्थिक मंदीमुळे मार्केटमध्ये पैसे नाही. त्यामुळे यंदा एकीकडे निवडणुकीचा खर्च असल्याने आगामी गरबा व दांडियाचा खर्च आखडता घ्यावा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली.