अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीला मान्यता
By admin | Published: August 5, 2015 02:12 AM2015-08-05T02:12:25+5:302015-08-05T02:12:25+5:30
अॅक्युपंक्चर या उपचार पद्धतीचे विनियमन करण्याकरिता महाराष्ट्र अॅक्युपंक्चर उपचार पद्धती विधेयक २०१५च्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या
मुंबई : अॅक्युपंक्चर या उपचार पद्धतीचे विनियमन करण्याकरिता महाराष्ट्र अॅक्युपंक्चर उपचार पद्धती विधेयक २०१५च्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. यामुळे आता अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांची नोंदणी केली जाईल व त्यांच्या व्यवसायाला नियमांच्या चौकटीत बसवता येईल. भविष्यात निसर्गोपचार, योगाद्वारे उपचार करणाऱ्यांनाही नोंदणी अनिवार्य करून त्यांच्यावर नियमांचे बंधन घालण्याचा सरकारचा इरादा आहे.
पश्चिम बंगालचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही राज्यात अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीबाबत कायदा नाही. राज्यात ठिकठिकाणी अॅक्युपंक्चरद्वारे उपचार केले जातात. तसेच याच्या क्लासेसचे पेव फुटले आहे. अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करताना रुग्णाला इजा पोहोचली तर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याकरिता कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे आता या कायद्यानुसार अॅक्युपंक्चर कौन्सिल स्थापन केली जाईल. ही कौन्सिल अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांकरिता नियमावली तयार करील. अॅक्युपंक्चरद्वारे उपचार करणाऱ्यांना कौन्सिलकडे नोंदणी करावी लागेल. अॅक्युपंक्चरचा अभ्यासक्रम तयार केल्यावर सध्या या उपचार पद्धतीच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. अॅक्युपंक्चरचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता दिली
जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी
दिली. (विशेष प्रतिनिधी)