Join us  

बोगस पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट

By admin | Published: March 14, 2016 2:10 AM

दिवसेंदिवस बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या संख्येत भर पडत असूनही कारवाईचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई : दिवसेंदिवस बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या संख्येत भर पडत असूनही कारवाईचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप एकही कारवाई झाली नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे म्हणणे आहे.‘लोकमत’ने गेल्या वर्षी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून मुंबईसह राज्यात ‘निदानाचा काळाबाजार’ समोर आणला होता. रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हे खेळ उघडकीस आल्यामुळे त्यावेळच्या अधिवेशनात विरोधी पक्षाने बोगस पॅथॉलॉजी लॅबवर प्रश्न विचारले होते. विधान परिषदेत पॅथॉलॉजीविषयी विचारण्यात आलेल्या लक्ष्यवेधी प्रश्नाला उत्तर देताना, तावडे यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या प्रश्नावर उत्तर देताना सुरुवातीला सरकारने बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी कायदा अस्तित्वात नसल्याचे सांगितले. त्यानंतर ‘बोगस डॉक्टर शोध समिती’ बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करू शकते, असे सांगण्यात आले. या घडामोडींनंतर बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणे अपेक्षित होते. पण, वर्षभरात परिपत्रक काढण्याचीही तसदी सरकारने घेतली नसल्याचे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी सांगितले. डॉ. यादव म्हणाले, परिपत्रक न काढल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना न मिळाल्याने अधिकारीही संभ्रमात आहेत. त्यामुळे कोणीही कारवाई करण्यास तयार होत नाहीत. (प्रतिनिधी)