मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा १६ किलोमीटर लांब मेट्रो ७ उन्नत मार्ग आणि त्यावरील १६ स्थानकांचे बांधकाम तीन पॅकेजमध्ये करण्यासाठी मागवलेल्या निविदांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शिवाय, या कामासाठी तीन कंत्राटदारांचीही शिफारसही करण्यात आली असून, हे कंत्राटदार १६ स्थानके व दरम्यानचा १६.५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग ३० महिन्यांत बांधून पूर्ण करणार आहेत.मुख्य सचिव आणि प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या पॅकेजमध्ये अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि न्यू अशोकनगर या पाच स्थानकांचे आणि स्थानकादरम्यानच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची शिफारस करण्यात आली आहे, तर आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी आणि महिंद्रा आणि महिंद्रा या दुसऱ्या पॅकेजमधील सहा स्थानकांचे बांधकाम व स्थानकादरम्यानच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी कुमार इन्फ्रा प्रोजेक्टची शिफारस करण्यात आली आहे. कार्यकारी समितीने तिसऱ्या पॅकेजमधील मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरी पाडी आणि दहिसर पूर्व या स्थानकांचे व उन्नत मार्गाच्या कामासाठी एन.सी.सी लिमिटेडची शिफारस करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो ७च्या निविदांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 3:52 AM