म्हाडाला विळखा दलालांचा
By admin | Published: May 25, 2015 02:43 AM2015-05-25T02:43:24+5:302015-05-25T02:43:24+5:30
धारावी बस आगाराशेजारीच असलेल्या म्हाडा संक्रमण शिबिरातील घरे सर्रासपणे अनधिकृतरीत्या भाड्याने देणे आणि विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याची
धारावी बस आगाराशेजारीच असलेल्या म्हाडा संक्रमण शिबिरातील घरे सर्रासपणे अनधिकृतरीत्या भाड्याने देणे आणि विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उघड झाली.
मुंबईत ठिकठिकाणी म्हाडा प्रशासनाची संक्रमण शिबिरे आहेत. म्हाडाच्या जागांवर असलेल्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरूपात घरे दिली जातात. ज्या जागांवर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकासाची कामे सुरू आहेत, अशा विकासकांनाही म्हाडा भाडेतत्त्वावर घरे देते. अशाच प्रकारे म्हाडाने धारावी येथील पीएमजी कॉलनीत २००८ साली उभारलेल्या संक्रमण शिबिरांतील घरे भाड्याने दिलेली आहेत. मात्र या घरांमध्ये घुसखोरांनी अतिक्रमण केल्याचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. काही घुसखोरांनी तर या ठिकाणी दलाली सुरू केली आहे. अवघ्या ४ ते ५ हजार रुपये मासिक भाड्यावर हे दलाल कोणत्याही व्यक्तीला घरे मिळवून देत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे येथील बंद घरांच्या चाव्याही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नक्की या घरांचा मालकी हक्क म्हाडाकडे आहे की दलालांकडे, हेच सर्वसामान्य भाडेकरूच्या लक्षात येत नाही. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. घरे भाड्याने देणारे दलाल येथील काही घरांची सर्रास विक्रीही करीत आहेत. अवघ्या ७ लाख रुपयांत येथे दलालांमार्फत घर मिळू शकते. घरांची विक्री केल्यानंतर म्हाडामधून घरे नावावर होत नाहीत, म्हणून दलाल गॅस सिलिंडर, पासबुक, वीज बिल आणि रेशन कार्ड असे काही पुरावेदेखील देऊ करतात, जेणेकरून काही वर्षांनी ही प्रकरणे उघड झाल्यास निष्कासनाविरोधात न्यायालयात धाव घेता येईल.
म्हाडाचा असाही कारभार....
विक्रोळी, कन्नमवार नगरमधील म्हाडा संक्रमण शिबिरात वास्तव्य करणाऱ्या भांबीड कुटुंबाला म्हाडाने धारावीतील संक्रमण शिबिरात पर्यायी गाळा दिला होता. मात्र प्रत्यक्ष गाळा पाहण्यासाठी गेलेल्या राजेंद्र भांबीड यांना धक्का बसला. गेल्या ९ महिन्यांपासून एक परप्रांतीय कुटुंब मासिक ५ हजार रुपये भाडे देऊन त्यांच्या घरात वास्तव्य करीत आहे. त्यामुळे विक्रोळीतील गाळा रिकामा केला नसताना आणि भांबीड यांच्या नावाने गाळ््याची नोंद असताना गाळ््याचा ताबा कोणी आणि कसा घेतला, असा सवाल भांबीड यांनी म्हाडाला विचारला.