महानिर्मिती-एसईसीएलच्या भागीदारीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:31 AM2018-04-11T05:31:21+5:302018-04-11T05:31:21+5:30
राज्यातील महानिर्मिती कंपनीला केंद्राकडून मिळालेल्या छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर २ या कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी कटघोरा-डोंगरगड रेल्वेमार्गाची उभारणी केली जाणार आहे.
मुंबई : राज्यातील महानिर्मिती कंपनीला केंद्राकडून मिळालेल्या छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर २ या कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी कटघोरा-डोंगरगड रेल्वेमार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनीमध्ये छत्तीसगड रेल कॉर्पोरेशन व साऊथ-ईस्टर्न कोललाइफ लिमिटेट (एसईसीएल) यांच्यासोबतच्या महानिर्मिती कंपनीच्या भागीदारीस मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महानिर्मिती कंपनीच्या एकूण औष्णिक विद्युत केंद्रांची स्थापित क्षमता १० हजार ३८० मेगावॅट इतकी आहे. त्यासाठी ४ कोटी १५ लाख ८६ हजार टन इतक्या कोळशाची दरवर्षी आवश्यकता असते. केंद्र शासनाने छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर २ ही खाण यासाठी महानिर्मितीस दिली असून पुढील ३० वर्षे या खाणीतून कोळशाचा पुरवठा होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या झासुगुर्डा-नागपूर या रेल्वे विभागील मार्गावरून पुरवठा होईल. मात्र, हा मार्ग वाहतुकीसाठी १०० टक्के व्यस्त असल्याने त्याला समांतर असा २७० किमीचा कटघोरा-डोंगरगड हा स्वतंत्र रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालय आणि छत्तीसगड शासन यांच्या एसपीव्ही मॉडेलद्वारे हा नवीन मार्ग उभारण्यात येणार असून त्यात महानिर्मिती कंपनीस भागीदार करून घेण्यास छत्तीसगड शासनाने मंजुरी दिली आहे. या कंपनीमध्ये महानिर्मिती २६ टक्के भागभांडवल गुंतवणार आहे. एकूण ४ हजार ८२० कोटींच्या या प्रकल्पातील ८० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उभारली जाणार असून उर्वरित गुंतवणूक तीन भागीदारांमार्फत केली जाणार आहे. त्यात महानिर्मितीला २५० कोटी ४० लाखांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. भविष्यात कराराचा भंग झाल्यास महानिर्मितीला नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येणार नाही, अशी तरतूद करून हा करार शासनाच्या मंजुरीनंतर करण्यात येईल.