मुंबई : चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो प्रकल्पाला रहिवाशांनी विरोध दर्शविल्याने मुुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा सुधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील ३ पैकी २ मेट्रो मार्गांना एमएमआरडीएच्या प्राधिकरण बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली असल्याने ‘मेट्रो-२’ प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे.एमएमआरडीएने चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो या प्रस्तावित प्रकल्प उभारणीचे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले होते. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार मेट्रो लाइन-२ चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि मेट्रो लाइन-४ चारकोप-दहिसर या मेट्रोमार्गाचा फेरविचार करून मेट्रो लाइन-२ प्रकल्प दहिसरपर्यंत वाढविण्याची शक्यता पडताळून सुधारित दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या एकत्रित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम एका सल्लागार संस्थेकडे सोपविण्यात आले होते. त्याबाबत सल्लागार संस्थेने सुधारित पूर्णत: भुयारी दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल गत वर्षी सादर केला होता.गेल्या महिन्यात प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत अंधेरी (पू.) ते दहिसर (पू.) हा १६.५ कि.मी. लांबीचा आणि दहिसर ते डी.एन. नगर हा १८.६ कि.मी. लांबीचा अशा दोन मेट्रो मार्गांच्या सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेले या दोन्ही मार्गाचे अहवाल मान्य करावेत, अशी शिफारस प्राधिकरणाने राज्य शासनाकडे केली आहे. -----------मार्गावरील स्थानके : दहिसर (पू.), दहिसर (प.), ऋषी संकुल, आय.सी. कॉलनी, एल.आय.सी. कॉलनी, डॉन बॉस्को, कस्तुर पार्क, एकता नगर, कांदिवली नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, ओशिवरा मेट्रो, समर्थ नगर, शशी नगर, डी.एन. नगर.--------स्थानके : दहिसर (पू.), श्रीनाथ नगर, बोरीवली ओम्कारेश्वर, बोरीवली बस डेपो, ठाकूर कॉम्प्लेक्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बाणडोंगरी, कुरार व्हिलेज, वीट भट्टी जंक्शन, आर.ए. रोड जंक्शन, व्ही. नगर, हब मॉल, बॉम्बे एक्झिबिशन, जे.व्ही.एल.आर. जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पू.)---------२0-२१मध्ये रोज ५.२९ लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, इंधन - वेळ वाचेल.
दोन मेट्रो प्रकल्पांना मान्यता
By admin | Published: September 29, 2015 3:11 AM