मुंबई : मनाची ताकद ओळखा, आत्मपरीक्षण करा, त्यातून ध्येयपूर्तीची ताकद मिळणार आहे, असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सोमवारी केले. नकारात्मक विचारांनी स्वत:चे आणि समाजाचे नुकसानच होणार आहे, अंतर्मनात एक विश्व वसत असते, त्याला पैलू पाडा. मनातील विचार वागण्यात प्रतिबिंबित होत असतात, जी स्वप्नपूर्तीपासून रोखत असतात. यामुळे प्रत्येकाने आपल्यातील ताकद वेळीच ओळखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा ४२वा जमनालाल बजाज पुरस्कार सोहळा गिरगाव येथील रॉयल आॅपेरा हाउस येथे सोमवारी सायंकाळी पार पडला. इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव, जमनालाल बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि विश्वस्त राहुल बजाज, फाउंडेशनच्या कौन्सिल आॅफ अॅडव्हायझर्सचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि कौन्सिल आॅफ अॅडव्हायझर्सचे सदस्यांच्या उपस्थितीत चार पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रघुनाथ माशेलकर म्हणाले की, काळ कोणताही असो गांधीजींची मूल्ये समाजासाठी महत्त्वाची होती आणि ती अविरतपणे तशीच राहतील. गांधीजींच्या विचारांचा अवलंब करणारा समाज हा नेहमीच आदर्श ठरतो, असे त्यांनी अधोरेखित केले.गांधी विचारांवर आधारित कार्य करणाºया व्यक्तींना सन्मान आणि प्रत्येक विभागात १०,००,००० रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. जमनालाल बजाज यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांचा सन्मान केला, त्या मूल्यांना जपण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने केला जातो.याप्रसंगी सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले की, समाजात सकारात्मकता आहे, ऊर्जा आहे, पण या शोधाची सुरुवात प्रत्येकाने अंतर्मनातून केली पाहिजे. अंतर्मनाचा ठाव लागला की, बदलांना सुरुवात होईल हे निश्चित आहे आणि या समाजात कुणी असे नाही, ज्याच्याकडे ही क्षमता नाही. या क्षमतांचा वेळीच विनियोग केला पाहिजे. अंतर्मनातील बदलानंतर आपोआप सर्वत्र बदल घडेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल, हेच खरे आनंद व समाधानाचे गमक आहे.यंदाच्या जमनालाल बजाज फाउंडेशन पुरस्कार शाश्वत कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार-राजस्थानच्या भवानी शंकर कुसुम, ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचा पुरस्कार-राजस्थानच्या मोहम्मद इमरान खान मेवाटी, महिला आणि मुलांचा विकास आणि त्यांचे हित यासाठीचा पुरस्कार जानकीदेवी बजाज यांच्या स्मरणार्थ पुरस्कार-महाराष्ट्रच्या शुश्री शाहिन मिस्त्री आणि भारताबाहेर गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मॅक्सिकोच्या सोनिया डेटो यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
मनाची ताकद ओळखा, आत्मपरीक्षण करा- सद्गुरू जग्गी वासुदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 2:00 AM