राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून चाचण्यांचा वेग वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:05 AM2021-09-19T04:05:23+5:302021-09-19T04:05:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून दहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून दहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याच्या तुलनेत या दहा जिल्ह्यांत सरासरी चाचण्यांचे प्रमाण कमी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून, आकडे घसरत आहेत. मात्र, पश्चिमात्य देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. शिवाय, केंद्रानेही याविषयी सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार, त्वरित कारवाई करत राज्यातील संसर्ग वाढीच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या १० जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण गतिमान करण्यात येणार असल्याचे प्रदीप व्यास यांनी म्हटले.
सध्या राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा २.६% आहे, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यात पुणे, सातारा, सांगली, नाशिक, पालघर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही चाचण्या वाढविण्याची गरज आहे. या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. याखेरीज आय सी एम आर चॅनेल देशांप्रमाणे कोरोना वैद्यकीय तपासणी अहवाल २४ तासांच्या आत रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचेही पडताळण्यात येत आहे.
दर दहा लाखांमागे ४.३४ लाख कोरोना चाचण्या
राज्याच्या आरोग्य विभागाने नुकतेच अकोला, बुलडाणा, धुळे, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये दर दहा लाखांमागे अडीच लाखांपेक्षा कमी कोरोना चाचण्या करण्यात येतात, तर राज्यात दर दहा लाखांमागे सरासरी ४.३४ लाख कोरोना चाचण्या करण्यात येतात.