लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५,१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी रात्री ट्विट करून दिली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून खासगी संस्थांना मुलाखती घेण्यासाठी ठरावीक कालावधी निश्चित करून देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेळापत्रक तयार करून उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे बंधनही घालण्यात येणार आहे. मुलाखतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य शासनाने बारा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय भरती करण्यात आली. यात सहा हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्त्या मिळालेल्या आहेत. आता ५६१ खासगी शैक्षणिक संस्थांमधील दोन हजार ६२ शिक्षकांची रिक्त पदे मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहे. प्रत्येकी ३० गुणांसाठी अशा या मुलाखती होणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ही मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
याकारणाने भरती लांबणीवर
पवित्र पोर्टलमार्फत होणारी ही शिक्षक पदभरती मराठा आरक्षण, पवित्र प्रणालीमधील तांत्रिक अडचणी यांमुळे लांबणीवर पडली होती. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक शैक्षणिक संस्थांना ही रिक्त पदांमुळे फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे या मुलाखती लवकरात लवकर पार पडून शिक्षक पदभरती व्हावी, अशी मागणी उमेदवार आणि शिक्षणसंस्थाही करत होत्या. अखेर शिक्षण विभागाकडून या उमेदवारांची बारकाईने तपासणी करून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
--------------
राज्यात सध्या विषयनिहाय शिक्षकांचा विचार केल्यास ५० हजारांहून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. मग केवळ सहा हजार, तीन हजार रिक्त पदभरती करून भावी शिक्षकांच्या तोंडाला शिक्षण विभाग आणि शासन पाने का पुसत आहे. संचमान्यतेचे निकष बदलून आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक भरती न केल्याचे भावी शिक्षकांचे नुकसान तर होतच आहे; मात्र भावी पिढीचे आणि सध्याच्या विद्यार्थ्यांचे नुकसानही होत आहे.
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष , शिक्षक भारती