Join us

हायकाेर्टात न्यायमूर्तीपदांसाठी ३ वकिलांची शिफारस; कुणाची निवड होणार याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 7:37 AM

शैलेश ब्रह्मे, फिरदोश पुनीवाला, जितेंद्र जैन यांना मिळणार संधी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी या शिफारशीला सहमती दर्शवली आहे.

नवी दिल्ली - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी तीन वकिलांच्या नावांची शिफारस केली आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने मंगळवारी वकील शैलेश प्रमोद ब्रह्मे, फिरदोश फिरोज पुनीवाला आणि जितेंद्र शांतीलाल जैन यांची नावे नियुक्तीसाठी प्रस्तावित केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून शिफारशी केल्या आणि २६ एप्रिल २०२३ रोजी न्याय विभागाने फाइल सर्वोच्च न्यायालयात पाठवली, असे कॉलेजियमने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी या शिफारशीला सहमती दर्शवली आहे.

पुनीवाला यांच्या नावाच्या संदर्भात, कॉलेजियमने सांगितले की, सल्लागार-न्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले की, ते पदोन्नतीसाठी योग्य आहेत आणि गुप्तचर विभागाने आपल्या अहवालात म्हटले की, त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा चांगली आहे. 

ब्रह्मे यांना ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभवकॉलेजियमने सांगितले की, सल्लागार-न्यायाधीशांनी ब्रह्मे यांना पदोन्नतीसाठी योग्य शोधण्यास सहमती दर्शविली. कारण ते दिवाणी, फौजदारी, घटनात्मक आणि सेवा कायद्याच्या खटल्यांमध्ये सुमारे ३० वर्षांचा अनुभव असलेले सक्षम वकील आहेत.

टॅग्स :उच्च न्यायालय