दोन वर्षांपूर्वीच केली होती पुलांच्या पाहणीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:41 AM2018-07-05T00:41:49+5:302018-07-05T00:42:05+5:30
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील रेल्वे रुळांवरील पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व पुलांची पाहणी करण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला केली होती.
मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील रेल्वे रुळांवरील पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व पुलांची पाहणी करण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाने अंधेरी पूल दुर्घटनेला निमंत्रण दिल्याचे वास्तव समोर येत आहे.
आॅक्टोबर २०१५मध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद विभागात रेल्वे रुळावरील पुलाचा (आरओबी) पादचारी भाग कोसळला होता. या पुलाचे आयुर्मान ५० वर्षे होते. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. अपघातग्रस्त पुलांच्या पादचारी भागात पेव्हरब्लॉकचा वापर झाल्यामुळे पूल कोसळल्याची माहिती समोर आली होती. नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या रेल्वे सुरक्षा आयोगातर्फे या दुर्घटनेची चौकशी झाली. चौकशीअंती रेल्वे सुरक्षा आयोगाने दिलेल्या अहवालात पश्चिम रेल्वेच्या सर्व पुलांची पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, अशी शिफारस आयोगाने केली होती.
दरम्यान, अंधेरी पूल दुर्घटनेची चौकशीही रेल्वे सुरक्षा आयोगाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयोग, पश्चिम रेल्वेचे पूल अभियंते, विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता घटनास्थळी भेट देत पाहणीस सुरुवात केली. चौकशी अहवाल १८ जुलैपर्यंत देण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केल्या आहेत.
केबल्सला परवानगी कुणाची? अंधेरी पूल दुर्घटनेत कोसळलेल्या पुलाच्या पादचारी भागात पेव्हरब्लॉकचा वापर केला होता. पुलाच्या पादचारी भागामध्ये अतिउच्च दाबाच्या केबल्स टाकल्या होत्या. पूल कोसळल्यानंतर तब्बल ६२ केबल्स अधांतरी असल्याचे दिसून आले. यात इंटरनेट, टेलिकॉमसह अन्य केबल्सचा समावेश आहे. मंगळवारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर या केबल दूर करून दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पुलामध्ये केबल्स टाकण्यासाठी कोणाची परवानगी होती? किती केबल्सला परवानगी होती? या प्रश्नांच्या उत्तरांचा पश्चिम रेल्वे सध्या शोध घेत आहे.
बुधवारी ६० लोकल फेºया रद्द
बुधवारी पश्चिम रेल्वेवरील ६० लोकल फेºया रद्द करण्यात आल्या. अंधेरी पूल दुर्घटनेत मंगळवारी ५९४ लोकल फेºया रद्द करण्यात आल्या. तर ७०२ नियमित आणि ५१५ लोकल फेºया चालवण्यात आल्या होत्या.
प्रवाशांनी घेतला मेट्रोचा आधार
अंधेरीची दुर्घटना घडून २४ तास उलटून गेल्यावरही पश्चिम रेल्वेचा वेग बुधवारी मंदावलेलाच होता. अंधेरीच्या आसपास असणाºया मरोळ, असल्फा, साकीनाका या भागात अनेक इंडस्ट्रियल कंपनी आहेत. दररोज या कंपनीमध्ये काम करायला येणारे अनेक कर्मचारी अंधेरी स्टेशनला उतरून शेअर रिक्षाने कार्यालयात पोहोचतात, पण बुधवारीही पश्चिम रेल्वेची सेवा धिम्या गतीने सुरू असल्याने नवी मुंबई, डोंबिवली, ठाणे, कल्याण परिसरातून पश्चिम उपनगरांत कामाला जाणाºयांनी घाटकोपरला उतरून मेट्रोचा पर्याय निवडला. त्यामुळे मेट्रोला गर्दी असल्याचे चित्र होते.
दहा दिवस पश्चिम रेल्वे ३० किमी प्रतितास धावणार
पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्री १ वाजता अपघातग्रस्त झालेले
सर्व मार्ग प्रवासासाठी खुले केले. मात्र धिम्या मार्गावरील तांत्रिक अडचण, क्रॉसओव्हरमुळे विविध टप्प्यांतर्गत एकूण ७०० मीटर रेल्वे रुळावर २० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
आगामी १० दिवस पश्चिम रेल्वेवरील अंधेरी मार्गावरील धिम्या लोकल वेगमर्यादेसह धावणार असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. तर बुधवारी सायंकाळी ४ वाजेपासून अनिश्चित काळासाठी सुरक्षेच्या दृष्टीने वेगमर्यादा ३० किमी प्रतितास करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागाने सांगितले. दुर्घटनेपूर्वी हा वेग ५० ते ६० किमी प्रतितास एवढा होता.