मुंबई : आरएसएससंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या समन्सविरोधात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेला पुनर्विचार अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
२०२१ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. मुंबईचे वकील व आरआरएसचे समर्थक संतोष दुबे यांनी अख्तर यांच्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला. अख्तर यांनी आरएसएसची प्रतिमा धुळीस मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.
याप्रकरणी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने कारवाई करत अख्तर यांना समन्स बजावले. मात्र, अख्तर मुलुंड न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला सत्र न्यायालयात आव्हान देत पुनर्विचार अर्ज दाखल केला. सोमवारी सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यावर उच्च न्यायालयात जाऊ, असे अख्तर यांच्या वकिलांनी सांगितले.