पश्चिम उपनगरातील पाच धोकादायक पुलांची पुर्नंबाधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:37 AM2019-09-18T01:37:51+5:302019-09-18T01:37:56+5:30
धोकादायक ठरलेल्या पुलांची दुरुस्ती व पुर्नबांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई - धोकादायक ठरलेल्या पुलांची दुरुस्ती व पुर्नबांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम उपनगरातील तीन पूल व दोन पादचारी पूल धोकादायक असल्याने पाडण्यात येणार आहेत. वाहतूक विभागाकडून मंजुरी मिळताच या पुलांची पुर्नबांधणी सुरु होणार आहे.
यावर्षी मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पुलाचा भाग कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचे आॅडिट पुन्हा एकदा करण्यात आले. यामध्ये पश्चिम उपनगरातील पाच पूल तातडीने पाडण्याची गरज असल्याचे समोर आले. मात्र पूल पाडून त्याची पुर्नबांधणी होईपर्यंत वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे पुलांची दुरुस्ती व पुर्नबांधणी टप्याटप्याने सुरु आहे.
पश्चिम उपनगरातील पाच धोकादायक पुलांच्या पुर्नबांधणीचे काम मे.बुकान इंजिनीअर्स एॅन्ड इन्फ्रास्ट्क्चर प्रा.लि. या ठेकेदाराला देण्यात येणार आहे. पावसाळ्यातील काळ वगळता दोन वर्षांच्या कालावधीत या पुलांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तशी अटचं ठेकेदाराला घालण्यात आली आहे. पुलांच्या पुर्नबांधणीवर ३९ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
> या पुलांची पुनर्बांधणी...
गोरेगाव पूवॅ येथील वालभट नाल्यावरील पूल,
कांदिवली पश्चिम येथील एस.व्ही.पी.रोड वरील पूल,
मालाड पश्चिम येथील टेलिफोन एक्सचेंजजवळील पूल
रामचंद्र नाल्यावरील पूल,
कांदिवली पश्चिम, सरोजिनी नायडू मार्ग, विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील पादचारी पूल व कांदिवली पूर्व, नवरंग रोड येथील आकुर्ली रोडवरील पादचारी पूल.