बीकेसीतील पदपथाची पुनर्रचना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनविण्यासाठी होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:48 AM2021-02-10T02:48:59+5:302021-02-10T02:49:22+5:30

प्रकल्पाच्या पहिल्या २ टप्प्यांत वांद्रे-कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमधील ८ जंक्शन्सची सुधारणा करणे व जंक्शन्सदरम्यानच्या रस्त्यांवर सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळ मुक्त पादचारी क्षेत्र आदी सुविधा वाढविणे या बाबींचा समावेश आहे.

Reconstruction of footpath in BKC | बीकेसीतील पदपथाची पुनर्रचना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनविण्यासाठी होणार बदल

बीकेसीतील पदपथाची पुनर्रचना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनविण्यासाठी होणार बदल

Next

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे. परिणामी पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रास साजेशा दर्जामध्ये उन्नत करणे आवश्यक झाले असून, त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन्स यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

येथील प्रकल्पाच्या पहिल्या २ टप्प्यांत वांद्रे-कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमधील ८ जंक्शन्सची सुधारणा करणे व जंक्शन्सदरम्यानच्या रस्त्यांवर सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळ मुक्त पादचारी क्षेत्र आदी सुविधा वाढविणे या बाबींचा समावेश आहे. एकूण ८ जंक्शन्सपैकी पहिल्या टप्प्यात ४ जंक्शन्स आणि  जंक्शन्सदरम्यानचे रस्ते एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देणे आणि वाहतूक सुधारणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यासाठी उपलब्ध जागेचा सुसंगत वापर करण्याबरोबरच पार्किंग, ई-चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, बोलार्ड्स, वाहतूक चिन्हफलक आदीसह स्ट्रीट फर्निचरची तरतूद करण्यात आली आहे.

सल्लागार म्हणून नेमणूक
वांद्रे कुर्ला संकुल हा व्यावसायिकदृष्ट्या मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक आहे. येथील वाहतूक सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की विविध पायाभूत सुविधांसाठी सध्या उपलब्ध असलेली जागा आणि या सुविधा वापरणाऱ्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. या अनुषंगाने एमएमआरडीएचे आर. ए. राजीव यांनी वांद्रे कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणाऱ्या यूडीएआय यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
प्रकल्पाची मुख्य वैशिष्टे
सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅकचे बांधकाम करणे व आरामदायक, रुंद आणि वर्दळमुक्त पदपथ बांधणे
अस्तित्वात असलेल्या झाडांच्या मुळांचे रक्षण करणे
नवीन झाडे लावण्यासाठी सच्छिद्र काँक्रिट जाळीचा वापर करणे
अ‍ॅडॉप्टिव्ह आर्टसाठी जागेची तरतूद
ब्रँडिंगसाठी सुयोग्य ठिकाणांची निवड
रिक्षांकरिता पुरेसे वाहनतळ व पुरेशा बसस्थानकांकरिता जागेचे नियोजन
वाहनांच्या ई-चार्जिंगसाठी जागा उपलब्ध
आपत्कालीन वाहनांसाठी, रुग्णालय आणि पोलिसांच्या व्हॅन्ससाठी जागा राखीव
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

Web Title: Reconstruction of footpath in BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.