मुंबई - पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे गोरेगाव पश्चिम येथील एक इमारत कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षात पालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीचा भाग पाडण्यात आला. दोन टप्प्यात इमारतीचा उर्वरित भाग पाडल्यानंतर त्या ठिकाणी ११ मजल्यांचे अद्ययावत रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात तब्बल तीनशे खाटांची व्यवस्था असणार आहे.
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालय १९९८ मध्ये बांधण्यात आले. सहा मजल्याच्या या इमारतीमध्ये १७२ खाटांची व्यवस्था आहे. मात्र २०१९ मध्ये हे रूग्णालय बंद करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार बुधवारी रुग्णालयाची इमारत पडण्यास सुरुवात झाली. मात्र कोणतेही स्पोट न करता पोकलेन मशिनच्या साह्याने ही इमारत पाडण्याचे काम सुरू झाले. पुढील दोन आठवड्यांमध्ये इमारत पाडण्याचे पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महापालिकेनेही या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांमार्फत इमारतीच्या जमीनदोस्त केलेल्या बांधकामाचे डेब्रिज उचलण्यात येणार आहे. त्यानंतरच इमारतीचा उर्वरित भाग पाडण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून आराखडा तयार केला जाणार आहे या प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने अर्थसंकल्पात केली आहे. हे रुग्णालय अद्यावत केल्यानंतर गोरेगाव ते दहिसरपर्यंतच्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.